
एकाच दिवशी सहा एसटी बसेस ब्रेकडाऊन झाल्याचा रेकॉर्ड मुरुड एसटी आगाराने केला आहे. अचानक ब्रेकडाऊन झाल्यामुळे या सर्वच एसटी बसेस विविध मार्गांवर अडकून पडल्या. त्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल झाले. दरम्यान बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बसेसचे ब्रेकडाऊन आणि बिघाडाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
मुरुड एसटी आगारात नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे गाड्या अनेक ठिकाणी रस्त्यात बंद पडलेल्या आढळून येत आहेत. आज सकाळी ८.३० वाजता सुटणारी सुपेगाव मार्गे रोहा गाडी एक तास उशिरा सुटली. ही गाडी विहूरनजीक आली असता ब्रेकडाऊन झाले.
मंगळवारी तर मुरुड आगाराच्या सहा गाड्या ब्रेकडाऊन झाल्यामुळे एकाच दिवशी गाड्या ब्रेकडाऊन होण्याचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे.
ठळक घटना
- मुरुड–सुपेगाव गाडी नेहमीप्रमाणे डेपोतून निघाली. ती विहूर येथे आल्यानंतर बंद पडली. त्यानंतर दुसरी गाडी रोहा–सुपेगाव मार्गावर मार्गस्थ झाली. यात वाहनचालक व प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागला.
- काही ना काही कारणाने मुरुड आगाराच्या गाड्या रस्त्यात बंद पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. एसटीचे कर्मचारीही वैतागले आहेत.
- मंगळवारी दुपारी दीड वाजता सुटणारी मुरुड–पनवेल गाडी काळे खिंड येथे बंद पडली. ती गाडी तिथून परत अलिबाग येथे आणली. या गाडीचे काम रात्री १० वाजता झाले.
- यापाठोपाठ मुरुड–ठाणे एसटी बसचेही ब्रेकडाऊन झाले. बंद पडलेल्या या गाडीच्या जागेवर दुसरी गाडी रवाना करण्यात आली.
- अलिबाग–मुरुड ही मुरुड डेपोत येणारी गाडी आगारातून बाहेर येत असतानाच तिचेही ब्रेक फेल झाले. त्यामुळे ती गाडीही बंद पडली.
एकापाठोपाठ एक सहा गाड्या बंद पडल्यामुळे सर्व मार्गांवर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मध्येच अडकून पडलेल्या काही प्रवाशांना पुढील प्रवासासाठी खासगी वाहनांमधून नाईलाजास्तव जावे लागले.






























































