
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) मोठी बंडखोरी उफाळून आली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी गुरुवारी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. हे आमदार भाजपविरोधी मतांवर निवडून आले असून, आता भाजपासोबत जाऊन त्यांनी मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप मोइत्रा यांनी केला आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
बुधवारी टीएमसीच्या ८० पैकी ५८ नवनिर्वाचित आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रथींद्रनाथ बोस यांची भेट घेतली. नुकतेच पक्षातून निलंबित करण्यात आलेले आमदार रितब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांच्या नेतृत्वाखालील या बंडखोर गटाने पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी आवश्यक असलेला दोन तृतीयांश बहुमताचा आकडा पार केल्याचा दावा केला आहे. तसेच टीएमसी विधिमंडळ पक्षावर आपला हक्क सांगत रितब्रत बॅनर्जी यांची अधिकृत विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना महुआ मोइत्रा यांनी निवडणूक आयोगावरही कडाडून टीका केली. निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले म्हणून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकांदरम्यान केंद्रीय सुरक्षा दलांची वर्तणूक आणि मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब करण्याच्या प्रकारावरही त्यांनी बोट ठेवले. मोइत्रा म्हणाल्या की, टीएमसीने पक्षाच्या चिन्हावर आणि ममता बॅनर्जी यांच्या नावावर ४१ टक्के मते मिळवली आहेत. त्यामुळे हे बंडखोर आमदार केवळ ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वामुळे आणि भाजपविरोधी मतांवर निवडून आले आहेत. आता ते स्वतःला स्वतंत्र म्हणवून घेऊ शकत नाहीत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी.
\ममता बॅनर्जी यांनी शून्यातून पक्ष उभा केला आहे, त्यामुळे जर तुम्ही भाजपविरोधात लढत असाल तर घाबरण्याचे कारण नाही, असे त्या म्हणाल्या. तुम्ही स्वतःला मूळ तृणमूल कसे म्हणू शकता? ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत, असे सांगत पक्षात शुद्धीकरण व्हायलाच हवे, असेही त्या म्हणाल्या.




























































