
कुवेतची हवाई हद्द बंद झाल्याने कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कुवेतकडे चाललेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमानाला हवेतूनच माघारी परतले. कुवेतसाठी विमानसेवा पुरवणाऱ्या केवळ दोन हिंदुस्थानी विमान कंपन्या एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो यांनी आपली सेवा स्थगित केल्याची घोषणा केली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने कुवेतसाठीची आपली विमानसेवा 6 जूनपर्यंत स्थगित केली आहे. या विमान कंपनीने फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच कुवेतची सेवा स्थगित केली होती. त्यानंतर मंगळवारी 2 जून रोजी बंगळुरू ते कुवेत या विमानासह त्यांनी पुन्हा सेवा सुरू केली होती. मात्र, बुधवारी नियोजित असलेली त्यांची दोन्ही विमाने त्यांना रद्द करावी लागली.
कुवेतची हवाई हद्द बंद झाल्यामुळे कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कुवेतकडे जाणारे विमान क्रमांक IX 393 (CCJ-KWI) 3 जून रोजी माघारी वळले आणि कोझिकोड येथे परतले. यानंतर प्रवाशांना विनामूल्य रिशेड्युलिंग किंवा तिकीट रद्द केल्यास संपूर्ण परतावा मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

























































