Lord’s Cricket Ground – क्रिकेटच्या पंढरीत इतिहास रचला गेला! लॉर्ड्स 150 कसोटी सामन्यांचे यजमानपद भूषवणारे जगातील पहिले मैदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून (04 जून 2026) लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सुरुवात झाली आहे. या सामन्यासह लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या नावावर क्रीडा जगतातील एका अनोख्या आणि ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांचे यजमानपद भूषवण्याच्या बाबतीत लॉर्ड्स मैदान आधीच पहिल्या क्रमांकावर होते, मात्र इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेला हा सामना या मैदानावरील ऐतिहासिक 150 वा कसोटी सामना ठरला आहे. असा टप्पा गाठणारे हे जगातील एकमेव क्रिकेट मैदान बनले आहे. दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर पहिला कसोटी सामना 1884 मध्ये खेळवला गेला होता. तद्नंतर इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक देशाचा संघ लॉर्ड्सवर किमान एक सामना खेळण्यास नेहमीच उत्सुक असतो. या मैदानावर आतापर्यंत अनेक मोठ्या स्पर्धांचे अंतिम सामने खेळवले गेले आहेत, ज्यामध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना देखील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात याच मैदानावर खेळवला गेला होता.

BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराला हटवून ‘या’ खेळाडूकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवणार?

सर्वाधिक कसोटी सामने आयोजित करणाऱ्या मैदानांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड 118 सामन्यांसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मैदान आहे. तर तिसऱ्या स्थानावर देखील ऑस्ट्रेलियाचेच सिडनी क्रिकेट ग्राउंड असून तिथे 114 सामने खेळवले गेले आहेत. हिंदुस्थानचा विचार केल्यास, हिंदुस्थानात सर्वाधिक कसोटी सामन्यांचे यजमानपद भूषवण्याचा विक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमच्या नावावर आहे, जिथे आतापर्यंत एकूण 43 कसोटी सामने खेळवले गेले आहेत.

जगातील सर्वाधिक कसोटी सामन्यांचे यजमानपद भुषवणाऱ्या आघाडीच्या मैदानांमध्ये लॉर्ड्स (150 सामने) पहिल्या, मेलबर्न (118 सामने) दुसऱ्या, सिडनी (114 सामने) तिसऱ्या, केनिंग्टन ओव्हल (108 सामने) चौथ्या आणि ओल्ड ट्रॅफर्ड (86 सामने) पाचव्या क्रमांकावर आहे.