
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) झालेल्या मोठ्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ईडी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून भाजप विरोधी पक्षांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या ८० पैकी ५८ आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वासोबत बंडखोरी करून टीएमसी विधिमंडळ पक्षावर आपला हक्क सांगितल्यानंतर संजय सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “भाजप ज्या पद्धतीने काम करते, त्यामध्ये पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा वापर करून लोकांना धमकावणे हा देशात एक खेळ बनला आहे. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस फोडली, तसेच गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही काँग्रेस पक्ष फोडला. त्यांनी आमचा आप पक्ष देखील फोडला.”
भाजपला सर्व पक्ष फोडून देशावर राज्य करायचे आहे, असा आरोप करत सिंह पुढे म्हणाले की, “यावर एकमेव उपाय जनतेकडे आहे. जनतेने त्यांना त्याच वेळी योग्य ते चोख उत्तर दिले पाहिजे, हाच यावरील एकमेव मार्ग आहे.”




























































