
मुंबईकरांना मान्सूनच्या आगमनाचे वेध लागले असतानाच महापालिका आणि आपत्कालीन व्यवस्थापनाने उंच लाटांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची पावले उचलली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्र अनेकदा खवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 24 वेळा समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या भरती काळात मुंबईच्या किनारी उंच लाटा धडकणार असल्याचा सावधगिरीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, या पावसाळ्यात मुंबईतील समुद्र खूप खवळलेला असेल. जून ते सप्टेंबर या काळात 4.89 मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता असून 16 जुलै रोजी मोठी भरती येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, जून आणि जुलैमध्ये सहा, ऑगस्टमध्ये पाच आणि सप्टेंबरमध्ये सात वेळा समुद्राला भरती येण्याची शक्यता आहेत. पहिली भरती 14 जून ते 19 जूनपर्यंत येईल. या कालावधीत समुद्राच्या लाटांची उंची 4.64 मीटर ते 4.87 मीटरपर्यंत असू शकते.
नागरिकांनी भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे. वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना आणि इशाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मच्छीमार आणि नौकाचालकांना विशेषतः सतर्क रहावे, असे म्हटले आहे.





























































