जाऊ शब्दांच्या गावा – उंबराचा फुलू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे

उंबराचं झाड म्हटलं की, बालकवींची औदुंबर कविता आठवते. ‘

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटातून, चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे, पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे, हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे, झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर’ या ओळी डोळ्यांसमोर फेर धरू लागतात. तसं तर उंबराचं झाड गावात अन् शहरातसुद्धा अगदी सहज दृष्टीस पडतं. दत्त संप्रदायात त्याला आध्यात्मिक स्थान आहे. त्याच्या नसणाऱया किंवा असणाऱ्या फुलाविषयीही कितीतरी गोष्टी आपण लहानपणापासून ऐकलेल्या असतात, पण फूल सोडूनही उंबराविषयी बरंच काही सांगण्यासारखं आहे.

उंबर हा वड, पिंपळ, अंजीर इ. वृक्षांच्या कुळातील सदापर्णी वृक्ष आहे. त्याला अंजिरासारखीं फळे येतात. त्याच्या हिरव्या फळांची भाजी करतात. याचे लाकूड चिकट असते. सालीचा रस औषधी असतो. प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, म्यानमार, भारत इ. देशांत हा वृक्ष आढळतो. या वृक्षाचं शास्त्रीय नाव फायकस रेसिमोझा किंवा फायकस ग्लोमेरॅटा असं आहे. ही झाली उंबराच्या झाडाविषयीची शास्त्राrय माहिती. उंबराला संस्कृतमध्ये ‘औदुंबर’ किंवा ‘उदुंबर’ असं नाव आहे. गुजरातीत उंबरो म्हटलं जातं.

उंबराला फूल नसतं, असा एक लोकसमज आहे. त्याविषयी बऱयाच लोककथा, लोकगीतं आहेत. एक वारली गीत आहे – ‘सात भावांची एखली बहीण, मांगते उंबराचा फुलू, सारवेली उंबराचे बना, सात गं राती राखीयेला, नाय मिलं उंबराचा फुलू.’ या गीताचा अर्थ आहे – सात भावांची एकुलती एक बहीण आपल्या भावांकडे उंबराचं फूल मागते. फूल मिळावं म्हणून भाऊ उंबराचं बन सारवतात आणि सात रात्री राखण करतात. तरी त्यांना उंबराचं फूल मिळत नाही. उंबराला रात्री फूल येतं व ते सोन्याचं असतं, असाही लोकसमज आहे. प्रत्यक्षात उंबराच्या झाडाला इतर झाडांप्रमाणे फुलं लागत नाहीत. त्याच्या फळाच्या आतच फूल असतं.

शास्त्रीय भाषेत सांगायचं तर उंबराचं फळ म्हणजे त्या वनस्पतीचा पुष्पसमूहच असतो. हे फळ फोडल्यावर फुलं दिसतात. एकूण काय, इतर झाडांप्रमाणे उंबराच्या झाडाला फुलं येत नाहीत, त्यामुळे त्याला फूलच नसतं, अशी समजूत निर्माण झालेली आहे. त्यातूनच दुर्मीळ, अप्राप्य, कधी न दिसणाऱ्या, न घडणाऱ्या, नसणाऱ्या अशा गोष्टींसाठी ‘उंबराचं फूल’ ही संकल्पना वापरली जाते.

‘उंबरं फोडून केंबरं काढणं’ अशी एक म्हण प्रचलित आहे. खरं तर ब्लागस्टोफॅगा सेनेस या चिलटाएवढय़ा कीटकाची मादी अंडी घालण्यासाठी त्या फळात प्रवेश करते. उंबराचं फळ फोडलं म्हणजे हे कीटक म्हणजे केंबरं बाहेर पडतात. लहानशा गोष्टीसाठी मोठय़ा गोष्टीचा नाश केला जातो तेव्हा ही म्हण वापरली जाते. संकुचित, कोती वृत्ती असणाऱया मनुष्याला ‘कूपमंडूक’ म्हटलं जातं. म्हणजे डबक्यातलं बेडूक, त्याला डबकं हेच सगळं जग आहे असं वाटतं. अगदी त्याच धर्तीवर ‘उंबरातील चिलटास उंबरच ब्रह्मांड’ असंही म्हणण्याची पद्धत आहे.

‘भरले पोटा उंबर कडू’ अशीही एक म्हण आहे. उंबराचं फळ हे चवीला गोड असतं, पण मनुष्याचं पोट भरलेलं असलं म्हणजे गोड पक्वान्नही नकोसं होतं, हे सांगण्यासाठी ही म्हण वापरली जाते.

‘उंबर पिकलं आणि नडगीचे डोळे आले’ किंवा ‘उंबरे पिकली अस्वलांचे डोळे आले’, अशी म्हण आहे. म्हणजे ज्याच्या नशीबात सुख भोगावयाचे नाही त्याला वैभव मिळाले तरी किंवा संधी आली तरी त्याचा योग्य उपयोग करून घेणे काहीतरी कारणामुळे अशक्य होते. ‘भटो तुमचे पोट हो का वाकडे? तर म्हणाला, उंबर राहिले म्हणजे झाले’. याचा अर्थ, पोट हे अन्न साठवण्याचे साधन आहे. ते काम त्याने केल्यावर त्याच्या आकाराकडे लक्ष देण्याचे कारण नाही. मुद्दय़ाची गोष्ट बरोबर असल्यावर आनुषंगिक गोष्टीकडे लक्ष देण्याचं कारण नाही.

घराचा ‘उंबरा’ किंवा ‘उंबरठा’ हा शब्दही उंबरापासून तयार झाला आहे. आपल्याकडे घराच्या, दाराच्या चौकटीच्या खालचं लाकूड हे उंबराच्या झाडाचं वापरण्याची परंपरा होती. कालांतराने कोणतंही लाकूड वापरलं तरी त्याला ‘उंबरा’च म्हटलं जाऊ लागलं. हल्ली काही घरांमध्ये लाकूडच वापरलं जात नाही, पण परंपरेने आपण चौकटीखालील जागेला उंबराच म्हणतो.