गंभीर-आगरकर आमने-सामने! टी-20 कर्णधार पदावरून दोघांमध्ये वाद; उद्या मुंबईत होणार घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. टी-20 संघाच्या कर्णधार पदावरून गंभीर आणि आगरकर यांच्यात कमालीचे वाद असल्याचे आता समोर आले आहे. गुरुवारी हिंदुस्थानच्या नव्या कर्णधाराची घोषणा करण्यात येणार होती. पण या दोघांमधला वाद चिघळल्यामुळे आता शनिवारी याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या दोन खेळाडूंनाही मिळू शकते संधी

श्रेयसला आगरकर यांची पसंती आहे, तर संजूला गंभीर यांची. पण हिंदुस्थानच्या कर्णधार पदासाठी अजून दोन खेळाडूंच्या नावांचीही जोरदार चर्चा आहे. यामधला पहिला खेळाडू म्हणजे रजत पाटीदार. कारण गेल्या दोन्ही वर्षांत आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे रजतला हा हिंदुस्थानच्या कर्णधार पदाच्या रांगेत असल्याचे म्हटले जात आहे. या शर्यतीमधील अजून एक खेळाडू म्हणजे तिलक वर्मा. मुंबई इंडियन्स तिलककडे भावी कर्णधार म्हणून पाहत आहे. तिलक अजून पाच वर्षे तरी टी -20 क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे तिलककडे भावी कर्णधार या नात्याने भारतीय संघ व्यवस्थापनही पाहू शकते.

हिंदुस्थानच्या कर्णधारपदी कोणाची होऊ शकते निवड

हिंदुस्थानच्या कर्णधार पदासाठी आता श्रेयस आणि संजू यांच्यात जोरदार टक्कर सुरू आहे. नियमानुसार निवड समिती अध्यक्षाचा निर्णय अंतिम राहायला हवा. त्यानुसार आता आगरकर यांचे म्हणणे सर्वात महत्त्वाचे ठरते. त्यामुळे श्रेयस अय्यर हा पुढचा नवा टी-20 कर्णधार होऊ शकतो, असे समोर येत आहे. 

गंभीर यांची पसंती कोणाला

गंभीर हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असून संघ निवडीमध्ये त्यांचा सहभाग सध्या महत्त्वाचा ठरत आहे. आगरकर यांना श्रेयस अय्यरला कर्णधार पद द्यायचे असले तरी गंभीर यांना मात्र ते मान्य नाही. कारण गंभीर यांची पसंती ही संजू सॅमसनला आहे. कारण संजू हा सध्या चांगल्या लयीत आहे आणि त्यामुळेच त्याला नेतृत्व देण्याची ही योग्य वेळ असल्याचे गंभीर यांना वाटत आहे.

आगरकर यांची पसंती कोणाला

अजित आगरकर यांनी टी-20 कर्णधार पदासाठी एक नाव सुचवले आहे आणि ते या शर्यतीत सर्वात पुढे आहे. आगरकर यांची पसंती आयपीएलमधील पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला आहे. कारण गेल्या सलग दोन्ही हंगामांत श्रेयसने दमदार नेतृत्व केले आहे, त्याचबरोबर त्याची फलंदाजीही चांगली झाली होती. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर हा भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार व्हावा, असे आगरकर यांना वाटत आहे.