रोलां गॅरोवर रशियाचा युक्रेनवर हल्ला; मिरा आंद्रेइवाने युक्रेनी कोस्टय़ुकला कोर्टावरच लोळवले, प्रथमच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोर्ट फिलिप शात्रिएवर गुरुवारी फक्त टेनिस नाही, तर युद्ध पेटलं. रशिया-युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या उपांत्य सामन्यात 19 वर्षांच्या रशियन सनसनाटी मिरा आंद्रेइवाने युक्रेनच्या मार्ता कोस्त्युकचा अवघ्या 65 मिनिटांत 6-1, 6-3 असा निर्दयी धुव्वा उडवत पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम फायनलचं तिकीट बुक केलं. हा सामना टेनिसपेक्षा राजकारणानेच जास्त तापला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पोलंडच्या माया ख्वालिन्स्काने रशियाच्या डायना स्नायडरचा 7-6 (7-4), 6-4 असा पराभव करत प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता जेतेपदासाठी ती आंद्रेइवाशी भिडेल.

पहिल्या गेमपासूनच हल्ला, कोस्टय़ुक हतबल

आठव्या मानांकित आंद्रेइवाने सुरुवातीलाच कोस्टय़ुकच्या आत्मविश्वासाची राखरांगोळी केली. पहिल्या सेटमध्ये 4-0 अशी आघाडी घेत तिने युक्रेनी कोस्टय़ुकला श्वासच घेऊ दिला नाही. कोस्टय़ुकने याआधी दोन्ही लढती जिंकल्या होत्या, पण यावेळी आंद्रेइवाच्या आक्रमक पह्रहँड आणि खोलवर जाणाऱ्या ग्राउंडस्ट्रोकपुढे ती निष्प्रभ ठरली. दुसऱ्या सेटमध्ये कोस्टय़ुकने थोडी उसळी मारली, पण आंद्रेइवाने क्षणार्धात ती बंडखोरी चिरडून टाकली.

कोर्टावर युद्धाचे पडसाद ः नो फोटो, नो हँडशेक

2022 च्या रशियन आक्रमणापासून युक्रेनी खेळाडूंची रशियन खेळाडूंशी न भिडण्याची परंपरा कायम राहिली. कोस्टय़ुकने सामन्यापूर्वीचा पारंपरिक फोटो नाकारला आणि सामन्यानंतरही नेटवर हँडशेक टाळले. कोर्टवरचे राजकारण चाहत्यांच्या डोळ्यात सलत होतं, पण आंद्रेइवाने त्याकडे दुर्लक्ष करत फक्त विजयावर नजर ठेवली.

ग्रॅण्डस्लॅमवीर होण्याच्या मार्गावर झ्वेरेव

सिनर गेला, जोकोविच गारद, अल्काराझ तर आधीच मैदानाबाहेर आणि रोलां गॅरोचं सिंहासन आता अलेक्झांडर झ्वेरेवला खुणावतंय. शुक्रवारी उपांत्य फेरीत झेकच्या याकुब मेन्सिकशी झ्वेरेव्हची गाठ पडणार असून तो चौथ्यांदा ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत झेप घेण्याची संधी आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इटलीचे मॅटिओ अरनाल्डी आणि फ्लाविओ कोबोली एकमेकांशी भिडतील.

यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये जगातल्या टेनिसचे चित्रच पालटलेय. गतविजेता अल्काराझ दुखापतीने बाद झाला, अव्वल नंबर सिनर आणि 24 ग्रॅण्डस्लॅम किंग जोकोविच यांच्याही अनपेक्षित एक्झिटने स्पर्धेतील रंगतच संपली. आता या सर्व गदारोळात सर्वात अनुभवी, सगळ्यात तगडा दावेदार म्हणून झ्वेरेव एकटा उरलाय. ऑलिम्पिक गोल्ड आहे, दोनदा एटीपी फायनल्स जिंकलाय, पण ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये तीनदा जाऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. आता पॅरिस त्याला ‘आता नाही तर कधीच नाही’ असं सांगतंय.

झ्वेरेवच्या चौथ्या ग्रॅण्डस्लॅम फायनलमध्ये जाण्याच्या वाटेत उभा आहे 26वा मानांकित याकुब मेन्सिक. झ्वेरेवकडे 24 एटीपी टायटल्स, तर मेन्सिककडे फक्त 2. झ्वेरेवकडे अनुभवाचा डोंगर विरुद्ध तरुणाईचा जोश आहे. मेन्सिकसाठीही पहिलं ग्रॅण्डस्लॅम फायनलचं दार उघडं आहे. त्यामुळे तोही जीव तोडून लढणार यात वाद नाही. दुसरीकडे इटालियन डर्बी रंगणार आहे. इटली विरुद्ध इटलीच आहे. सिनरच्या माघारीने दहावा मानांकित फ्लेवियो कोबोली आणि मॅटेओ आर्नाल्डी यांना नशिबाने लॉटरी लागलीय.