संख्याबळ असताना सत्ताधाऱ्यांना घोडेबाजार करण्याची गरज का पडली? संजय राऊतांचा निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी या विषयावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत उमेदवारांच्या माघारीसाठी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. पुरेसे संख्याबळ असतानाही विरोधकांना रोखण्यासाठी आर्थिक ताकदीचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. विधान परिषद निवडणुकांसाठी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षांकडून बंडखोर उमेदवारांची मनधरणी सुरू होती. काही ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली, तर काही ठिकाणी निवडणुकीची लढत कायम राहिली. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची सरबत्ती केली.

सत्ताधाऱ्यांकडे मोठे बहुमत असतानाही निवडणुकांमध्ये बिनविरोध विजय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या हालचाली जनतेच्या लक्षात येत असल्याचे सांगत राऊत यांनी या सर्व आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. “लोक सर्व काही पाहत आहेत. लोकशाहीतील पारदर्शकता टिकवायची असेल तर या व्यवहारांची सत्यता समोर आली पाहिजे,” असे ते म्हणाले.

राऊत यांनी यावेळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि इतर काही भागांतील उमेदवारी माघारीसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाल्याचेही माध्यमांसमोर म्हटले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत सुमारे 150 कोटींचा वापर झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. “जर सत्ताधाऱ्यांकडे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ आधीच असेल, तर उमेदवारांना माघार घेण्यासाठी एवढी धडपड का केली जाते?” असा सवाल यावेळी संजय राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाचाही उल्लेख केला. “देशाच्या पंतप्रधानांकडून खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले जाते, मात्र निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. हा विरोधाभास कसा समजायचा?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कोकणातील एका उमेदवारी माघारीसाठी 25 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप करत त्यातील मोठी रक्कम मुंबईतील बीकेसी परिसरातील एका हॉटेलमध्ये देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही अशाच प्रकारच्या आर्थिक व्यवहारांच्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण लोकशाही मूल्यांना धक्का देणारे असल्याची टीका करत राऊत म्हणाले की, बहुमत असूनही विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आर्थिक आणि राजकीय दबावाचा वापर केला जात आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.