बिहारमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग; पाच जणांचा मृत्यू, आयसीयूच्या खिडक्या-दरवाजे तोडून रुग्णांना बाहेर काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीतील हॉटेलला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आणि 20हून अधिक होरपळले. ही घटना गुरुवारी पहाटे तीन वाजता घडली.

आयसीयूच्या एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट आणि त्यानंतर झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली आणि ती वेगाने पसरली. अग्निशमन दल रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आयसीयू वॉर्ड पाचव्या मजल्यावर आहे. त्यामुळे बचाव कार्याला अडथळे आले. जवानांनी खिडक्या व दरवाजे तोडून लोकांना बाहेर काढले. मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर प्रसाद रुग्णालयातून काही रुग्ण बेपत्ता असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. या रुग्णालयावर कारवाई केली जाईल. काही नातेवाईकांचा आरोप आहे की, त्यांचे रुग्ण वॉर्डमधून गायब आहेत. या साऱ्याची चौकशी केली जाईल, असे मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी सुब्रता कुमार यांनी सांगितले.

कर्मचारी पळून गेले

नातेवाईकांनी आरोप केला आहे की, कर्मचारी घटनास्थळावरून गायब होते. कुटुंबीय रुग्णांना स्ट्रेचरवरून बाहेर घेऊन जाताना दिसले. आयसीयू वॉर्ड पाचव्या मजल्यावर असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. घटनास्थळी उपस्थित स्थानिक धीरज गिरी म्हणाले, मी हॉस्पिटलच्या छतावर झोपलो होतो. अचानक किंकाळ्या ऐकू आल्या. मी खाली आलो, तेव्हा लोक जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे दिसले. काही जण हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना शिव्या देत होते. वॉर्डमध्ये धुरामुळे काहीही दिसत नव्हते.

93 वर्षीय रुग्णाने दिली माहिती

लोकांचे म्हणणे आहे की, मृतांचा आकडा लपवण्यासाठी पोलिसांनी घाईघाईने घटनास्थळावरून मृतदेह हलवले. आग लागल्यानंतर तातडीने पाणी पुरवले असते, तर मृतांचा आकडा कमी झाला असता. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 93 वर्षीय राधा देवी म्हणाल्या, ‘‘मला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अचानक वॉर्डमधून धूर येऊ लागला. मी लगेच माझा ऑक्सिजन मास्क काढून बाहेर आले. मी बाहेर येऊन सुरक्षारक्षकाला आत आग लागल्याची माहिती दिली.’’