
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली ‘अॅमेझॉन’मध्ये अलीकडच्या काळात 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात झाली आहे. मात्र त्याच वेळी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) 30 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. यामुळे अॅमेझॉनला आता अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत असून कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अमेरिकेतील सिएटल येथे सिटी कौन्सिलच्या सुनावणीत, काही अॅमेझॉन अभियंत्यांनी उघडपणे स्वतःच्याच कंपनीविरोधात आवाज उठवला. कंपनी मोठे एआय डेटा सेंटर्स उभारत असताना कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे चुकीचे आहे, असे म्हणणे अभियंत्यांनी मांडले. या अभियंत्यांनी केवळ नोकरकपातीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर डेटा सेंटर्सबद्दलही चिंता व्यक्त केली.
एआय आणि डेटा सेंटर्सविरोधात आंदोलन
केवळ अॅमेझॉनच नाही, तर संपूर्ण टेक इंडस्ट्री सध्या एआयच्या शर्यतीत उतरली आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल यासारख्या कंपन्याही या शर्यतीत आहेत. प्रत्येक कंपनी एआयवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहे. या शर्यतीची किंमत कर्मचारी आणि जनतेला मोजावी लागत आहे. याविरोधात आंदोलने होत आहेत. अमेरिका आणि युरोपमधील अनेक ठिकाणी एआय-डेटा सेंटर्सविरोधात आंदोलने झाली आहेत.





























































