
विधान परिषद निवडणूकीचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेतून अजित पवार गटाचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. अनिकेत तटकरे हे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र तर महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांचे भाऊ आहेत. तटकरे यांच्याच घरात आता एक खासदारकी व दोन आमदारकीची पदं आली आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तटकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.
रोहित पवार यांनी X वर एका हॉटेलच्या बुकींग एन्ट्रीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात अशोक खरात ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्याच हॉटेलमध्ये रुपाली चाकणकर व सुनील तटकरे यांचे देखील बुकींग होते असे त्या फोटोतून समोर आले आहे. त्यावर बोलताना रोहित पवार यांनी तटकरेंवर जोरदार टीका केली.
”सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन-दोन पदं असताना आता तिसरंही आलं.. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम”, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.


























































