
शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून तीव्र विरोध होत आहे. या सर्वेक्षणासाठी महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी येणार असल्याची पूर्वकल्पना मिळाल्यामुळे पोलीस प्रशासनाने गुरुवारी पहाटेच मोठी कारवाई केली. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांच्या घरांवर छापे टाकत त्यांना ताब्यात घेतले. या अचानक केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या या दडपशाहीवरून आता राजकीय वातावरणही तापू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “शक्तीपीठ महामार्ग राक्षसी महत्त्वाकांक्षेचा भाग झाला आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवरून सरकारवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग हा राक्षसी महत्त्वाकांक्षेचा भाग झाला आहे की काय, असे आता वाटू लागले आहे. राज्यात सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच सर्वच स्तरांतून या महामार्गाला कडाडून विरोध केला जात आहे. असे असतानाही सरकारकडून हा शक्तीपीठ महामार्ग जनतेवर लादण्याचा प्रयत्न थांबताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शक्तिपीठ महामार्ग राक्षसी महत्वकांक्षेचा भाग झालाय का काय ? असं वाटायला लागलं आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना सर्व स्तरातून या महामार्गाला विरोध होत असताना देखील शक्तिपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न काही थांबताना दिसत नाही. माळशिरस तालुक्यात तर सर्वेक्षणसाठी अधिकारी येणार… pic.twitter.com/IjngS6RAgH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 5, 2026
माळशिरस तालुक्यातील परिस्थितीवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, केवळ सर्वेक्षणासाठी अधिकारी येणार म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या घरातून बळजबरीने उचलून ताब्यात घेणे, ही अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय बाब आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी हा लढवय्या आणि स्वाभिमानी आहे, तो या जुलमी सरकारच्या कोणत्याही दडपशाहीला आणि हुकूमशाहीला अजिबात घाबरणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, या अन्यायाविरुद्धच्या लढ्यात आम्ही पूर्ण ताकदीने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही देखील रोहित पवार यांनी दिली आहे.


























































