
गेल्या काही दिवसांपासून अन्नामलाई यांच्याबाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तामिळनाडूतील भाजपचे नेते के. अन्नामलाई यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अन्नामलाई यांनी भाजपमधील सर्व पदांचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
राजीनामा दिल्यानंतर अन्नामलाई यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत त्यांच्या राजीम्याची माहिती दिली. ”आज आम्ही एक चळवळ सुरू करत आहोत. आमचा राजकीय पक्ष येत्या विधानसभा निवडणूक लढवेल. मी 4 डिसेंबर 2025 लाच भाजपला राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी विधानसभा निवडणूकीनंतर राजीनामा द्या असे सांगितले त्यामुळे मी थांबलो होतो”, असे अन्नामलाई यांनी सांगितले.
भाजपाने आज जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, “भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मंजूर केला आहे.”
राजीनाम्यापूर्वी दिल्लीत खलबतं
अन्नामलाई यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली होती आणि “सलोख्याच्या वातावरणात” हा प्रवास थांबवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्नामलाई यांना राजकारणात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे बी. एल. संतोष यांचीही भेट घेतली.


























































