वणव्यामुळे काजू शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, दोषींवर कारवाई करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील चाफवली उगवता कोंडवाडी येथील काजूच्या बागांमध्ये वणवा गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा वणवा दिनांक 4 जून रोजी दुपारच्या दरम्यान लागला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत नुकसानीचे पंचनामे आज 5 जून रोजी करण्यात आले.

चाफवली गावातील उगवता कोंड वाडीतील प्रकाश गवळी, महेश धनावडे, चंद्रकांत घडशी , सुरेश धनावडे, संतोष धनावडे या शेतकऱ्यांच्या सुमारे 15 वर्षाच्या काजूच्या झाडांच्या बागेत वणवा लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा वणवा कसा व कोणी लावला याबाबत काही समजू शकलेले नाही. मात्र या वणव्यामुळे या शेतकऱ्यांचे गेल्या अनेक वर्षाच्या मेहनतीवर व कष्टावर पाणी फेरले आहे .

या काजूच्या बागा असलेल्या जागेतील अनावश्यक जंगल तोडून त्या भागात  गेली पंधरा वर्षे साफसफाई करून शेतकऱ्यांनी बागा उभ्या केल्या होत्या. मात्र एका माचिसच्या काडीने यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले आहे. गेल्या पंधरा वर्षाची मेहनत वाया गेली असून आज हाता तोंडाशी आलेली काजूबाग नष्ट झाल्याने या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचा शोध लागलेला नाही. या गोरगरीब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.