
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एका गुंतागुंतीच्या खुनाचा 24 तासांत छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. दारूच्या नशेत रोज होणाऱया छळाला कंटाळून मुलानेच मित्राच्या मदतीने बापाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खुनानंतर मुलाने बाप बेपत्ता झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी दोघांना बेडय़ा ठोकल्या.
फिरोज खानसा मुजावर (वय 44) असे खून झालेल्या बापाचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा रेहान फिरोज मुजावर (वय 20) आणि त्याचा मित्र वीरपाशा सैंदुलाल जहांगीरदार (रा. हनुमाननगर, शिये) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शिये (ता. करवीर) येथील हनुमाननगरमधील फिरोज खानसा मुजावर (वय 44) हे 29 मेपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा मुलगा रेहान याने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस तपास करत असताना 2 जून रोजी सकाळी शिरोली हद्दीतील एमआयडीसी भागात असलेल्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या शवविच्छेदनात मृताच्या तोंडात कापड कोंबलेले होते आणि डोक्यामागे धारदार शस्त्र्ााने वार केल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले. तपासादरम्यान मुलगा रेहान याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुह्याची कबुली दिली. वडील रोज दारू पिऊन आई आणि मला मारहाण करायचे. त्यांच्या त्रासाला कंटाळून मित्राच्या मदतीने खून केल्याचे सांगितले.
29 मे रोजी रात्री रेहानने त्याचे वडील फिरोज यांना घरामागे नेले. तेथे त्याने सत्तुराने त्यांच्या डोक्यावर वार करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मित्र वीरपाशा याच्या मदतीने मृतदेह दुचाकीवरून नेऊन शेतातील विहिरीत फेकून दिला. तसेच संशय येऊ नये म्हणून त्याने स्वतःच पोलीस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार दिली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सुनील गायकवाड, प्रमोद चव्हाण, अमित पांडे, संदीप पाटील, रामचंद्र कोळी, महेश अंबी, महेश खोत, वसंत पिंगळे, नजीर शेख, सुहास संकपाळ आणि नीलेश कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.































































