
तुटपुंज्या कर्जमाफीच्या आदेशाची होळी करत, सरसकट विनाअट कर्जमुक्तीची मागणी आज किसान सभेच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्जमाफी संदर्भात सरकारने काढलेल्या आदेशाची होळी करत सरकारच्या नावाने बोंब ठोकण्यात आली. यावेळी ‘कर्जमाफी नको कर्जमुक्ती द्या’, ‘उद्योगपतींना सोळा लाख कोटी कर्ज माफ करणाऱया सरकारचा धिक्कार असो’, ‘खासगी सावकारांकडील कर्ज माफ करा’, अशा घोषणा देण्यात आल्या.
किसान सभेचे राज्य सचिव गिरीश फोंडे म्हणाले, सरकारची ही कर्जमाफी योजना फसवी आहे. सरकारने केवळ 50 हजार अनुदान देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. हे सरकार उद्योगपतींची कर्जमाफी करते, पण शेतकऱ्यांची नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे अटी लावून लाखो शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर ढकलले जाईल. या विरोधात संपूर्ण कर्जमुक्तीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी शिवाजी कांबळे म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, अवजारे, खतांचा खर्च, इंधन खर्च वाढला आहे. याचा विचार न करता शेतकऱ्यांची फसवणूक केली. यावेळी शिष्टमंडळाने दिलेले निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत लेखी कळवण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले.































































