
इस्रायल आणि लेबनॉनमध्ये गुरुवारी अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली होती. यास 24 तास उलटत नाही तोच इस्रायलने लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर आणि चिफ इंजिनियर आबेद हार्ब याचा खात्मा झाला आहे. इस्रायली सैन्याने या कारवाईची माहिती दिली आहे.
इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, आबेद हार्ब हा हिजबुल्लाहच्या इंजिनिअरिंग युनिटचा प्रमुख होता. दक्षिण लेबनॉनमध्ये कार्यरत असलेल्या इस्रायली सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी अत्याधुनिक स्फोटके तयार करणे, बॉम्ब तयार करून तो सक्रिय करणे ही जबाबदारी त्याच्याकडे होती. तो हिजबुल्लाहचा अत्यंत अनुभवी आणि जुना कमांडर होता. गेल्या अनेक दशकांपासून इस्रायली सैनिकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांचा आणि कटांचा तो मुख्य सूत्रधार होता. ‘टाइम्स ऑफ इस्रायल‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
इस्रायलच्या हवाई दलाने दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या तळांवर रात्रभर बॉम्बवर्षाव केला. हिजबुल्लाहचे एक रॉकेट लॉन्चरही विमानांनी नष्ट केले. इस्रायली सैन्याने या हल्ल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर जारी केले आहे. मात्र हिजबुल्लाहने अद्याप या वृत्तास अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, वॉशिंग्टनमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली होती. मात्र ही शस्त्रसंधी एक दिवसही टिकली नाही आणि इस्रायलने लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले केले. 2 मार्चपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असून इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 3 हजार 526 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 हजारांहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
हिजबुल्लाहने शस्त्रसंधीचा करार धुडकावला
दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉनमध्ये झालेल्या शस्त्रसंधीचा करार हिजबुल्लाहने धुडकावून लावला आहे. हा करार म्हणजे फार्स असल्याचे हिजबुल्लाहने म्हटले. जोपर्यंत इस्रायल लेबनॉनवरील हल्ले थांबवत नाही आणि मागे हटत नाही, तोपर्यंत हिजबुल्लाहचे रॉकेट हल्ले अविरतपणे सुरूच राहतील, असा थेट इशारा कासिम यांनी दिला आहे.




























































