नाट्यमय घडामोडीनंतर पानसरे यांची माघार अहिल्यानगरात प्राजक्त तनपुरे बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दिवसभर रंगलेल्या राजकीय नाटय़मय घडामोडींना अखेर रात्री आठच्या सुमारास पूर्णविराम मिळाला. अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याची घोषणा केली. यामुळे अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांच्या विनंती व चर्चेनंतर आपण माघार घेत असल्याचे पानसरे यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दुपारी मच्छिंद्र धुमाळ यांनी प्रथम अर्ज मागे घेतला. त्यानंतर श्रीरामपूरचे करण ससाने यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतला. दुपारी दोन वाजता शेवगावचे कमलेश गांधी यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर फक्त अपक्ष दत्ता पानसरे आणि भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज राहिला होता.

आज दिवसभर पानसरे यांची उमेदवारी कायम राहू नये आणि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप पदाधिकाऱयांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, अनेक बैठका आणि चर्चेनंतरही पानसरे माघार घेण्यास तयार नव्हते. दिवसभरात दोनवेळा माजी आमदार प्राजक्त तनपुरे आणि दत्ता पानसरे यांच्यात चर्चा झाली होती. मात्र, त्यातून कोणताही निर्णय झाला नव्हता. अखेर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार संग्राम जगताप स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी पानसरे यांच्याशी चर्चा केली तसेच वरिष्ठ स्तरावरील नेत्यांशीही त्यांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेनंतर अपक्ष दत्ता पानसरे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे अखेर राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला.

दत्ता पानसरे यांच्या माघारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वातावरण निवळले. त्यानंतर राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि प्राजक्त तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी दत्ता पानसरे यांची भेट घेऊन अभिनंदन केले.

भाजपवाले त्रास देत असल्याने निवडणुकीत उमेदवारी

– पणन महामंडळातील भाजपाचे संचालक आम्हाला त्रास देत होते. त्यांनी आमच्याच मंडळाची चौकशी लावली होती, असा आक्षेप दत्ता पानसरे यांचा होता. सत्तेमध्ये असतानाही आम्हाला अशा प्रकारची वागणूक मिळाली होती. त्यामुळे पानसरे यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी करत यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे दत्ता पानसरे यांनी माघार घेतल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

लोकशाहीची थट्टा की सत्तेची ताकद?

n अहिल्यानगर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल आठ तास राजकीय घडामोडी घडल्या. सत्तेचा वापर आणि बळाचा प्रभाव कसा असतो, हे दाखवणारे अनेक प्रसंग दिवसभर पाहायला मिळाले. उमेदवारांच्या माघारीसाठी सुरू असलेल्या हालचाली, पडद्यामागील चर्चा, मानापमानाचे प्रसंग आणि सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापले होते. विशेष म्हणजे, विरोधकांपेक्षा सत्ताधारी गटातील नेते आणि पदाधिकाऱयांमध्येच विविध मुद्दय़ांवर आरोप-प्रत्यारोप झाल्याचे चित्र होते. दिवसभर चाललेल्या या घडामोडींमुळे लोकशाही प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. दबावतंत्र, राजकीय वाटाघाटी आणि सत्तेच्या प्रभावामुळे लोकशाही मूल्यांची थट्टा होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त झाली.

माझ्यावर कोणताही दबाव नाही – करण ससाणे

मी जनतेच्या आग्रहाखातर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता जनतेच्याच मागणीमुळे मागे घेतला आहे. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. तसेच मी काँग्रेस पक्षाकडे कधीही उमेदवारीची मागणी केलेली नव्हती, असे स्पष्ट मत अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.