करिअरची स्वप्ने अधुरीच, नोकरीसाठी दिल्लीत आलेल्या तरुणीचा आगीत होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करिअरची नवी सुरुवात करण्यासाठी दिल्लीत आलेल्या 25 वर्षीय श्रुतिका बारणवाल हिचा दक्षिण दिल्लीतील हौज रानी परिसरातील एका बेड-अँड-ब्रेकफास्ट (बी अँड बी) हॉटेल लागलेल्या भीषण आगीत मृत्यू झाला. बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत एकूण 21 जणांचा मृत्यू झाला असून श्रुतिकाच्या निधनामुळे तिच्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

झारखंडमधील बोकारो येथील रहिवासी असलेल्या श्रुतिका बारणवालने मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) येथून ‘वॉटर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. तिची पदवी अधिकृतपणे आगामी दीक्षांत समारंभात प्रदान होणार होती.

कॅम्पस प्लेसमेंटद्वारे श्रुतिकाची ‘रबर, केमिकल अँड पॉलिमर स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल’मध्ये निवड झाली होती. नोकरीच्या प्रारंभिक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ती याच आठवड्यात दिल्लीला आली होती. प्रक्रिया पूर्ण करून ती परत जाणार होती आणि त्यानंतर आपल्या व्यावसायिक आयुष्याला सुरुवात करणार होती. या नव्या संधीबाबत ती अत्यंत उत्साहित असल्याचे तिच्या मित्रांनी सांगितले.

मात्र, तिच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण काही तासांतच दुःखद ठरला. बुधवारी बी अँड बी हॉटेलला भीषण आग लागली तेव्हा श्रुतिका तिचा मित्र अमन सिंह याच्याशी फोनवर बोलत होती. त्याचवेळी आगीची घटना घडली. या दुर्घटनेत श्रुतिकासह 21 जणांचा मृत्यू झाला.

आगीत मृत्युमुखी पडलेल्या अनेक जणांमध्ये जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक होते. मात्र श्रुतिका ही कामानिमित्त दिल्लीत आली होती. करिअरच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.