
जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर नेपाळी शेर्पाचा (गाईड किंवा वाटाड्या) मृत्यू झाल्याची बातमी येते आणि कुटुंब शोकसागरात बुडते. घरी बौद्ध परंपरेनुसार अंत्यविधीची तयारी सुरू होते, पण अचानक स्थानिक न्यूज चॅनलवर तोच माणूस मृत्यूच्या दारातून सुखरूप परतल्याची बातमी झळकते. एखाद्या चित्रपटालाही मागे टाकेल अशी थरारक घटना एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान घडली आहे. हिलरी दावा शेर्पा असे या गाईडचे नाव आहे.
एव्हरेस्टवरून खाली उतरताना हिलरी दावा शेर्पा हे बेपत्ता झाले होते. 29 जून रोजी एव्हरेट सर करून खाली येत असताना त्यांना कॅम्प 3 च्या वर म्हणजे सुमारे 7500 मीटर उंचीवर शेवटचे पाहिले गेले होते. त्यानंतर त्यांचा इतर सहकाऱ्यांशी संपर्क तुटला होता. ते बेस कॅम्पवरही पोहोचू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला असे समजले जात होते.
हिलरी दावा शेर्पा बेपत्ता झालेले तो परिसर एव्हरेस्टचा डेथ झोन म्हणून ओळखला जातो. या भागात हवेचा दाब अत्यंत कमी असतो आणि ऑक्सिजनची पातळी मानवी अस्तित्वासाठी अपुरी असते. त्यामुळे अशा प्रतिकूल हवामानात जिवंत राहण्याची शक्यता अगदी नगण्य मानली जात होती. त्यांच्या एका सहकाऱ्याने तर सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहणारा व्हिडिओही पोस्ट केला होता. मात्र, 6 दिवसांनंतर ते स्वतः बर्फातून सरपटत बेस कॅम्पच्या दिशेने येत असताना बचाव पथकाला आढळले.
गुरुवारी सकाळी एक शोध पथक बेस कॅम्पच्या वर असलेल्या खुंबू आइसफॉलच्या बर्फाळ उतारावरून खाली येत असताना त्यांना हिलरी दावा शेर्पा स्वतः बर्फातून सरपटत खाली येताना दिसले, अशी माहिती या शोधमोहिमेचे समन्वयक ‘8 के एक्स्पेडिशन्स’चे कार्यकारी संचालक पेम्बा शेर्पा यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या हाताला ‘फ्रॉस्टबाइट’ झाला आहे. परंतु त्यांची प्रकृती ठीक असून ते शुद्धीवर आहेत. त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवून अन्न आणि पाणी देण्यात आले. त्यानंतर हेलिकॉप्टरने काठमांडूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हिलरी दावा शेर्पा हे मरण पावल्याचे समजून काठमांडू येथील त्यांच्या घरी बौद्ध परंपरेनुसार अंत्यविधीची तयारी सुरू होती. याचवेळी स्थानिक न्यूज चॅलवर ते जिवंत असल्याची बातमी झळकली. आम्ही ही बातमी ऐकली तेव्हा सुरुवातीला आमचा विश्वास बसला नाही. एव्हरेस्टवरून वाचवण्यात आलेली व्यक्ती आमचे बाबाच असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही बचाव पथकाकडून फोटो मागवले. त्यांनी पाठवलेले फोटो पाहून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमचे बाबा जिवंत होते, असे त्यांची मुलगी मेंडो ल्हामू शेर्पा म्हणाली. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
त्या दिवशी काय घडले?
एव्हरेस्टवरून खाली उतरत असताना थकवा जाणवल्याने शेर्पा विश्रांतीसाठी थांबले आणि त्यांनी इतर सहकाऱ्यांना पुढे जाण्यास सांगितले. त्यांच्याकडे सॅटेलाईट फोन आणि रेडिओ असल्याने इतर सहकारी पुढे निघून गेले, अशी माहिती गिर्यारोहक ख्रिस थ्रॉल यांनी सांगितले. थ्रॉल यांना पोलंडचा एक गिर्यारोहक गंभीर अवस्थेत सापडला. त्याला वाचवण्यासाठी थ्रॉल आणि इतर सहकारी पुढे निघून गेले. शेर्पा यांना अनुभव असल्याने ते खाली येतील असा अंदाज होता. मात्र खराब हवामानामुळे ते तिथेच अडकून पडले. जवळपास सहा दिवस ते या भागात अडकून पडले होते. जवळचे अन्नपाणी संपल्याने त्यांनी बर्फ खाऊन दिवस काढले. त्यानंतर सरपटत कॅम्पकडे निघाले.



























































