लेख – रशिया-तालिबान सहकार्याचा अन्वयार्थ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

अलीकडील काळात सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे रशिया आणि अफगाणिस्तानातील तालिबान सरकार यांच्यात वाढत असलेले संबंध. मॉस्को आणि तालिबान यांच्यात राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य वाढत असून लष्करी-तांत्रिक करारही झाले आहेत. अफगाणिस्तान भविष्यात रशियासाठी सैनिक पुरवणारा स्रोत बनू शकतो, अशी चर्चा आहे. रशियाला अतिरिक्त मनुष्यबळ आणि मध्य आशियात प्रभाव हवा आहे. दुसरीकडे तालिबान सरकार आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय एकाकीपणा आणि बाह्य मदतीच्या गरजेशी झुंज देत आहे. त्यामुळे दोघांनाही सहकार्य वाढवण्याची गरज वाटत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आता पाचव्या वर्षात प्रवेशले आहे. हे 21व्या शतकातील सर्वात दीर्घ, हिंसक आणि थकवणाऱया युद्धांपैकी एक आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांवर प्रचंड ताण पडला असून विशेषतः लढाऊ सैनिकांच्या मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. आधुनिक युद्धांमध्ये ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर युद्ध, अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याची शस्त्रs यांचे महत्त्व वाढले असले तरी भूभाग ताब्यात घेण्यासाठी, संरक्षणात्मक तळ सांभाळण्यासाठी आणि दीर्घकाळ युद्ध चालू ठेवण्यासाठी मोठय़ा संख्येने सैनिकांची आवश्यकता आजही तितकीच महत्त्वाची आहे.

युद्धाच्या सुरुवातीपासून रशियाला मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सहन करावी लागली आहे. हजारो सैनिक मारले गेले, जखमी झाले किंवा लढण्यास अयोग्य ठरले आहेत. अनेक सैनिक वर्षानुवर्षे आघाडीवर राहिल्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा थकले आहेत. त्यामुळे त्यांना विश्रांती देऊन नवीन सैनिकांची भरती करणे आवश्यक झाले आहे.

रशियाची लोकसंख्या मोठी असली तरी देशव्यापी सक्तीची लष्करी भरती वारंवार करण्यास क्रेमलिन टाळत आहे. कारण त्यामुळे देशांतर्गत असंतोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच रशियाने मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण आणि वादग्रस्त मार्ग स्वीकारले आहेत. कैद्यांची भरती, परदेशी नागरिक, स्थलांतरित कामगार आणि खासगी लष्करी कंपन्यांतील सैनिक यांचा वापर हा रशियाच्या मनुष्यबळ धोरणाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

रशिया-तालिबान जवळीक

भविष्यात रशियाने अफगाणिस्तानचा सैनिक स्रोत म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतल्यास काही शक्यता निर्माण होऊ शकतात. पहिली शक्यता म्हणजे तालिबान लढवय्यांची करारबद्ध सैनिक म्हणून थेट भरती. तालिबानच्या लढवय्यांनी जवळपास वीस वर्षे अफगाण सैन्य आणि नाटो दलांविरुद्ध युद्ध केले आहे. कठीण परिस्थितीत लढणे, प्रतिकूल भूप्रदेशात टिकून राहणे आणि तंत्रज्ञानाने अधिक सक्षम शत्रूविरुद्ध दीर्घकालीन संघर्ष करणे यांचा त्यांना मोठा अनुभव आहे. गनिमी युद्ध, सापळे, अचानक हल्ले आणि विखुरलेल्या लढाऊ कारवायांमध्ये ते पारंगत आहेत. त्यामुळे सैनिकांची गरज भासत असलेल्या रशियासाठी ते आकर्षक पर्याय ठरू शकतात.

दुसरी शक्यता म्हणजे, रशियन सैन्यात आधीपासून असलेल्या परदेशी तुकडय़ांप्रमाणे अफगाण स्वयंसेवक दल तयार करणे. अशा तुकडय़ांना मागील भागातील सुरक्षा, खंदकांचे संरक्षण, रसद व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचे रक्षण किंवा अगदी आघाडीवरील पायदळ म्हणूनही वापरले जाऊ शकते. त्यामुळे रशियाला आपले प्रशिक्षित सैनिक आक्रमक मोहिमांसाठी मोकळे ठेवता येतील आणि तुलनेने कमी तांत्रिक कौशल्याची कामे तालिबान सैनिकांकडून करून घेता येतील.

तिसरी शक्यता म्हणजे, रशिया अफगाणिस्तानला आर्थिक मदत, लष्करी उपकरणे, राजनैतिक मान्यता, पायाभूत सुविधा विकास किंवा आर्थिक गुंतवणूक देऊ शकतो. त्याच्या बदल्यात अफगाणिस्तानकडून मनुष्यबळ मिळू शकते. अफगाणिस्तानातील बेरोजगारी आणि आर्थिक संकट लक्षात घेता अनेक युवक स्थानिक रोजगारापेक्षा जास्त वेतनासाठी परदेशी लष्करी सेवेकडे आकर्षित होऊ शकतात.

तालिबान किती प्रभावी?

तालिबानी लढवय्यांकडे युद्धाचा मोठा अनुभव आहे. ते धोकादायक परिस्थिती, हालअपेष्टा आणि अनिश्चिततेशी परिचित आहेत. त्यांची मानसिक सहनशक्ती आणि विचारधारात्मक प्रेरणा मजबूत आहे, परंतु युक्रेनमधील युद्ध हे अफगाणिस्तानातील युद्धापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. तालिबानने मुख्यतः गनिमी युद्ध केले. त्यांनी लहान तुकडय़ांमध्ये हल्ले, रस्त्यावरील बॉम्ब, सापळे आणि अचानक कारवायांवर भर दिला. याउलट युक्रेनचे रणांगण हे आधुनिक इतिहासातील सर्वात तांत्रिक रणांगणांपैकी एक बनले आहे. येथे मोठय़ा प्रमाणावर तोफखाना, अचूक मार्गदर्शित शस्त्रs, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, उपग्रह निरीक्षण, रणगाडे आणि हजारो ड्रोन सतत कार्यरत आहेत. FPV (First Person View) ड्रोन स्वतंत्र सैनिकालाही शोधून लक्ष्य करू शकतात. आधुनिक गुप्तचर प्रणाली सैन्याच्या हालचालींचे क्षणोक्षणी निरीक्षण करतात. अशा वातावरणात केवळ धैर्य पुरेसे नसते. तांत्रिक प्रशिक्षण, समन्वय, संप्रेषण कौशल्य आणि आधुनिक शस्त्र प्रणालींचे ज्ञान आवश्यक असते. त्यामुळे तालिबानी लढवय्यांना प्रभावी सैनिक बनण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पुनर्प्रशिक्षणाची गरज भासेल.

रशियाचे होणारे फायदे

जर रशियाने तालिबान किंवा इतर परदेशी सैनिकांची भरती करण्यात यश मिळवले तर त्याचा तत्काळ फायदा म्हणजे मनुष्यबळातील तूट भरून निघेल. अतिरिक्त सैनिकांमुळे रशिया थकलेल्या तुकडय़ांना विश्रांती देऊ शकेल, संरक्षणात्मक तळ सांभाळू शकेल आणि आक्रमक कारवाया सुरू ठेवू शकेल. याशिवाय परदेशी सैनिकांचा वापर केल्याने रशियन नागरिकांवर सक्तीच्या भरतीचा ताण कमी होईल. त्यामुळे देशांतर्गत राजकीय दबावही कमी राहील. तथापि, युद्ध जिंकण्यासाठी केवळ सैनिकांची संख्या पुरेशी नसते. प्रशिक्षण, नेतृत्व, रसद व्यवस्था, गुप्तचर माहिती, तंत्रज्ञान आणि मनोबल हे घटक तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे परदेशी सैनिक युद्ध लांबवण्यास मदत करू शकतात, परंतु ते युद्धाचा निकाल बदलू शकतील असे नाही.

भारतासाठी या घडामोडींमध्ये संधी आहेत. अफगाणिस्तानातील पाकिस्तानचा प्रभाव कमी झाल्यास भारताला अफगाणिस्तानशी संपर्क आणि संवादाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. रशियाचा प्रभाव वाढल्यास तालिबान अधिक व्यवहार्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याकडे झुकणारे धोरण स्वीकारतील अशीही शक्यता आहे. त्यामुळे भारतविरोधी अतिरेकी संघटनांवर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकते, परंतु धोकेही आहेत. युक्रेनमध्ये लढून परतणारे तालिबानी लढवय्ये आधुनिक ड्रोन युद्ध, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि नवीन रणतंत्रांचा अनुभव घेऊन परतू शकतात. हे कौशल्य भविष्यात भारताविरुद्ध कश्मीरमध्ये वापरले जाऊ शकते. तसेच तालिबानला वाढती आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यास त्यांच्या राजकीय ताकदीत वाढ होईल, परंतु त्यामुळे त्यांची विचारधारा मवाळ होईल याची हमी नाही.