
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शहराजवळ गेल्या एक-दोन वर्षांपासून तवंदी घाट विस्तारीकरण आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. एकीकडे वाहतुकीसाठी ही चांगली बाब असली, तरी गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळी पडत असलेल्या सततच्या जोरदार पावसामुळे या महामार्गावर जणू नदीचा प्रवाहच वाहू लागल्याचे पाहायला मिळाले. यामुळे लहान-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांचीही चाके महामार्गावरच काही काळ थांबली होती. या महामार्गावरून एका बाजूने वाहणाऱ्या जोरदार पाण्याच्या प्रवाहाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
तवंदी घाट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार झाले होते, पण पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र, बुधवारी आणि गुरुवारी वाळकी व याद्यानवाडी परिसरात ढगफुटीसदृश पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी तवंदी घाटात डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी थेट महामार्गावरून वाहत असल्याने वाहनधारकांना वाहने सावकाश चालवावी लागत होती. डोंगरातून येणारे लाल मातीचे पाणी आणि त्यासोबत येणाऱ्या लहान-मोठ्या दगडांमुळे वाहनधारकांना चालवताना मोठे अडथळे निर्माण झाले होते. यामुळे अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडली होती. या भागातील सर्वच परिसरात पाण्याचा मोठा लोंढा वाहताना दिसत होता, तसेच रस्त्याच्या मोठ्या चारीतून पाणी बाहेर पडून ते महामार्गावरून वाहत होते.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शहराजवळ तवंदी घाटात मुसळधार पावसामुळे महामार्गावर जणू नदीचा प्रवाहच वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.#kolhapur #HeavyRainfall pic.twitter.com/h0lUrBXYv0
— Saamana Online (@SaamanaOnline) June 5, 2026





























































