
तृणमूल काँग्रेसच्या (TMC) एका महत्त्वपूर्ण बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आपला पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. बंडखोर आमदारांचा विरोध असूनही ममता यांनी अभिषेक बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. तर ममता बॅनर्जी या स्वतः पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून कायम राहतील. याशिवाय पक्षाचे बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता दर्जा दिल्याविरुद्ध टीएमसीने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पक्षाकडून कलकत्ता उच्च न्यायालयात थेट आव्हान दिले जाणार आहे, असे वृत्त आज तकने दिले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाला अनेक राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या तणावपूर्ण वातावरणात शुक्रवारी संध्याकाळी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी एक बैठक पार पडली. ज्यामध्ये अत्यंत मोजक्याच नेत्यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या नेत्यांमध्ये माजी आमदार चंद्रिमा भट्टाचार्य, राज्यसभा खासदार डोला सेन, स्वरूपनगरच्या आमदार बीना मंडल, लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी आणि माजी मंत्री राजीव बॅनर्जी यांचा समावेश होता.
टीएमसीच्या अनेक बंडखोरांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्याविरुद्ध उघडपणे आक्षेप नोंदवला होता. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी अभिषेक यांच्यावर काही कारवाई करणार का, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. तत्पूर्वी टीएमसीने बुधवारी पक्षाच्या सर्व समित्या आणि संलग्न आघाड्या बरखास्त केल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या या बैठकीत पक्षाच्या सर्व समित्यांची पुनर्रचना करण्यात आली.
या पुनर्रचनेअंतर्गत अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याआधीही ते याच पदावर कार्यरत होते. टीएमसी नेते डेरेक ओब्रायन आणि डोला सेन यांची सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, हे दोन्ही नेते अभिषेक बॅनर्जी यांना त्यांच्या कामात मदत करतील. यासोबतच विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाचा चर्चित चेहरा राहिलेल्या सयानी घोष यांची टीएमसीच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्या यापूर्वीही याच पदावर होत्या. तसेच माला रॉय यांना टीएमसी महिला आघाडीच्या अध्यक्षा बनवण्यात आले आहे.



























































