POK आमचाच… गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर हिंदुस्थानने व्यक्त केला संतापला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) आपल्या कुरापती सुरू केल्या आहेत. बेकायदेशीररीत्या बळकावलेल्या कश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानने ७ जून रोजी सार्वत्रिक निवडणुका आयोजित केल्या आहेत. पाकिस्तानच्या या निर्णयावर हिंदुस्थानने शुक्रवारी कडक शब्दांत विरोध नोंदवला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेच्या ३३ सदस्यांच्या निवडीसाठी पाकिस्तान तब्बल सहा वर्षांनंतर ७ जून रोजी येथे निवडणूक घेत आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, पाकिस्तानने बेकायदेशीर आणि जबरदस्तीने ताब्यात घेतलेल्या हिंदुस्थानी भूभागात गिलगिट-बाल्टिस्तान असेंब्लीसाठी ७ जून रोजी होणाऱ्या तथाकथित सार्वत्रिक निवडणुकांच्या योजनेबाबत हिंदुस्थानी सरकारने पाकिस्तानसमोर तीव्र निषेध नोंदवला आहे. संपूर्ण जम्मू-कश्मीर आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश, ज्यामध्ये तथाकथित गिलगिट-बाल्टिस्तानचाही समावेश आहे, तो हिंदुस्थानचा अविभाज्य आणि अतूट भाग असल्याचा पुनरुच्चार हिंदुस्थानी सरकारने केला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमधील पाकिस्तानच्या प्रशासकीय, राजकीय आणि घटनात्मक पावलांवर हिंदुस्थाने वारंवार आक्षेप घेतला असून, अशा पावलांना कोणताही कायदेशीर आधार नाही आणि यामुळे या क्षेत्रावरील हिंदुस्थानच्या दाव्यामध्ये कोणताही बदल होत नाही, असे हिंदुस्थानने ठणकावून सांगितले आहे.

तसेच गिलगिट-बाल्टिस्तानसारख्या भागात बदल घडवून आणण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांवर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडकून टीका केली आहे. हिंदुस्थानने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या या दिखाव्यामुळे त्या भागात होणारे मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन, राजकीय दडपशाही, आर्थिक शोषण आणि स्वातंत्र्याचा अभाव यांसारख्या बाबी जगापासून लपवता येणार नाहीत. पाकिस्तानने हिंदुस्थानचे हे बेकायदेशीररीत्या बळकावलेले सर्व भूभाग त्वरित रिकामे करावेत, अशी मागणीही परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा केली आहे.