तामिळनाडूमध्ये भाजपला मोठा धक्का, पक्षामध्ये फूट; अण्णामलाईनंतर प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूमध्ये भाजपमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येत आहेत. पक्षाच्या प्रदेश सचिव सुमती व्यंकटेश यांनी राजीनामा दिला आहे. भाजप तामिळनाडूचे प्रदेश उपाध्यक्ष करू नागराजन यांनीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्यांमुळे राज्यातील भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी तामिळनाडूमध्ये एक नवीन राजकीय पक्ष सुरू करत असल्याची घोषणा केली. पक्ष सोडण्याचे कारण स्पष्ट करताना अण्णामलाई म्हणाले, मला लोकांमध्ये राहून त्यांच्यासोबत काम करायचे होते. भाजपने तामिळनाडूतील प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढावी, अशी माझी ठाम इच्छा होती. याबाबत पक्ष नेतृत्वाशी तामिळनाडूतील रणनीतीवरून आपले मतभेद उघड केले होते. त्यानंतर एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी आपल्या नव्या संघटनेच्या धोरणांची माहिती दिली. आम्ही एक नवीन राजकीय चळवळ सुरू करत आहोत. आम्ही तामिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून, त्यासाठी आपल्याला आतापासूनच सज्ज व्हावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आता अण्णामलाई यांच्यानंतर पक्षाच्या प्रदेश सचिव सुमती व्यंकटेश यांनी राजीनामा दिला आहे. भाजप तामिळनाडूचे प्रदेश उपाध्यक्ष करू नागराजन यांनीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.