पिंक बॉल अन् गौतम गंभीर खूश; कसोटी क्रिकेटसाठी आयसीसीचा क्रांतिकारी निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसोटी क्रिकेटमधील थरार आणखी वाढवण्यासाठी आणि खराब प्रकाशामुळे होणारे ओव्हर्सचे नुकसान टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, दिवसाच्या सामन्यादरम्यान जर ऊन कमी झाले किंवा प्रकाश कमी झाला, तर दोन्ही संघांच्या संमतीने स्टेडियममधील फ्लडलाइट्स सुरू केले जातील आणि लाल ऐवजी गुलाबी (पिंक) बॉलने खेळ सुरू ठेवता येईल. हा नवा नियम आगामी 1 ऑक्टोबरपासून लागू होणार असून, सामन्याची सुरुवात नेहमीप्रमाणे लाल चेंडूनेच होईल, मात्र प्रकाश कमी झाल्यास फ्लडलाइटमध्ये स्पष्ट दिसणाऱ्या गुलाबी चेंडूचा वापर केला जाईल.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आयसीसीच्या या ऐतिहासिक ट्रायलचे जोरदार समर्थन केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गंभीरने सांगितले की, हा निर्णय कसोटी सामन्यांचे निकाल लागण्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे. सामान्यतः खराब प्रकाशामुळे कसोटी सामने वेळेपूर्वीच थांबवावे लागतात, ज्यामुळे अनेक ओव्हर्स वाया जातात आणि चांगला चाललेला सामना अनिर्णित (ड्रॉ) स्थितीकडे झुकतो. अशा परिस्थितीत खेळाचा निकाल लागण्यासाठी हा नियम महत्त्वाचा ठरेल, असे गंभीरचे म्हणणे आहे.

Men’s U18 Hockey Asia Cup 2026 – सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; आशिष पूर्तीची धडाकेबाज कामगिरीमुळे हिंदुस्थान फायनलमध्ये

या नियमाचे कौतुक करताना गंभीरने खेळाडूंसमोरील आव्हानांचाही उल्लेख केला. तो म्हणाला, “मला हा नियम आवडला आहे, कारण जर सामन्याचा निकाल लावण्याची संधी असेल, तर ती आपण कधीच गमावू नये. विचार करा की तुम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलपूर्वीचा शेवटचा सामना खेळत आहात आणि तो जिंकून तुम्हाला पात्र ठरण्याची संधी आहे, पण खराब प्रकाशामुळे खेळ थांबला. अशा वेळी दोन्ही संघ सहमत असतील तर मी या नियमाच्या बाजूने आहे.” मात्र, एकाच सामन्यात लाल चेंडूवरून थेट गुलाबी चेंडूवर शिफ्ट होणे खेळाडूंसाठी थोडे आव्हानात्मक आणि कठीण असू शकते, असही गौतम गंभीर म्हणाला आहे.