
सरकारी तेल आणि वायू कंपनी असलेल्या ऑइल इंडिया लिमिटेडला (OIL) अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा शोध घेण्यात आणखी एक मोठे यश मिळाले आहे. अंदमानच्या सागरी क्षेत्रातील खोदण्यात आलेल्या तिसऱ्या विहिरीत नैसर्गिक वायूच्या अस्तित्वाची पुष्टी झाली असल्याची माहिती कंपनीने शुक्रवारी दिली. या ब्लॉकमधील ही दुसरी विहीर आहे, जिथे हायड्रोकार्बनचे (तेल आणि गॅस) संकेत मिळाले आहेत. या मोठ्या शोधामुळे भविष्यात हिंदुस्थानची आखाती देशांवरील गॅसचे अवलंबित्व कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विजयपुरम-३ नावाची ही विहीर अंदमान बेटांच्या पूर्व किनारपट्टीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर ३५५ मीटर खोल समुद्रात खोदण्यात आली आहे. ही विहीर ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी अंतर्गत विकसित केल्या जात असलेल्या ऑफशोअर अंदमान ब्लॉक AN-OSHP-2018/1 मध्ये आहे.
ऑइल इंडियाने सांगितले की, सुमारे १,९०० मीटरपेक्षा जास्त खोलीवर असलेल्या इओसीन रचनेत प्राथमिक उत्पादन चाचणी घेण्यात आली. यावेळी सातत्याने गॅस बाहेर पडल्याने आणि फ्लेअरिंगद्वारे तेथे नैसर्गिक वायूच्या अस्तित्वाची पुष्टी झाली. विहिरीला छिद्र (Perforation) पाडल्यानंतर आतील दाब वेगाने वाढला आणि गॅसचे उत्पादन सुरू झाले. सध्या या गॅसच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे, जेणेकरून त्याची रचना, ऊर्जा क्षमता आणि उत्पत्तीबाबत सविस्तर माहिती मिळू शकेल.




























































