
वाई तालुक्यातील एकसर गावाच्या मालुसरेवाडी बस स्टॉपजवळ डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज (05 जून 2026) घडली आहे. या भीषण अपघातात अभिजीत दत्तात्रय वाडकर (वय 33, रा. मालतपुर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अभिजीत हा नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता आपल्या दुचाकीवरून मालतपुरहून वाई येथील खासगी कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, वाईहून मालतपुरकडे जाणाऱ्या डंपर चालकाने हलगर्जीपणे आणि भरधाव वेगात डंपर चालवून अभिजीतच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर डंपर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिजीतला त्याचे चुलते आणि चुलत भाऊ दत्तात्रय महादेव वाडकर यांनी तातडीने बेल एअर हॉस्पिटल व त्यानंतर वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेप्रकरणी मृत अभिजीतचा चुलत भाऊ दत्तात्रय महादेव वाडकर याने वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक हरिश्चंद्र दत्तोबा कदम (वय 58, रा. आसले, ता. वाई) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाई पोलीस पुढील तपास करत आहेत.





























































