
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेत संगमेश्वर तालुक्यातून निवड झालेल्या चोरवणे ग्रामपंचायतीची शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पोलखोल केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे ग्रामपंचायतीने 23 मेट्रिक टन कचरा गोळा करत असल्याचे जाहीर केले आहे. ही ग्रामपंचायत एवढा कचरा टाकते कुठे? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेतील पारितोषिक पटकावण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते विक्रांत जाधव आणि संतोष थेराडे यांनी शुक्रवारी रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला.
सर्वसाधारण सभेत शुक्रवारी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते विक्रांत जाधव,संतोष थेराडे,नेहा माने,विशाखा कुवळेकर आणि प्रमोद निवळकर यांनी सडेतोड प्रश्न विचारत विरोधकांना घाम फोडला. संगमेश्वर तालुक्यात कडवई ग्रामपंचायतीचे काम चांगले असतानाही त्यांची पहाणी करण्यासाठी बाहेरचे पथक का आले नाही? कडवई ग्रामपंचायतीची निवड का झाली नाही? असा सवाल शिवसेनेच्या सदस्या विशाखा कुवळेकर आणि सदस्य संतोष थेराडे यांनी उपस्थित केला.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाच्या काळात केलेल्या कारभाराचा पाढा विक्रांत जाधव यांनी वाचला. आरजीपीएल कंपनीकडून ग्रामपंचायतला सवा कोटी रुपयांचा कर मिळतो हे पैसे प्रशासकांनी कुठे खर्च केले? वीजबिल गोळा करण्यासाठी ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करायची वेळ आली मग हे पैसे खर्च कुठे झाले? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे अंजनवेल ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी विक्रांत जाधव यांनी केल्यानंतर अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांनी चौकशीचे आदेश दिले.
धोकादायक नर्सरी
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक मोठ्या शिक्षणसंस्था गाळ्यामध्ये,पत्र्याच्या शेड मध्ये किंवा पहिल्या मजल्यावर अशा धोकादायक ठिकाणी नर्सरी चालवतात. उद्या दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा सवाल विक्रांत जाधव यांनी उपस्थित केल्यानंतर अध्यक्षांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडून अशा शाळांचा अहवाल मागून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
प्लास्टिक रिसायकल केंद्रातच वीज नाही- नेहा माने
प्लास्टिक बंदीबाबत सभागृहात जोरदार चर्चा झाली.प्लास्टिक गोळा केल्यानंतर रिसायकल बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. शिवसेनेच्या सदस्या नेहा माने म्हणाल्या की, साडवलीमध्ये प्लास्टिक रिसायकल केंद्र आहे पण तिथे वीजच नाही मग ते सुरू कसे करणार ?






























































