
मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना या वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी गेल्या वर्षीचाच जुनाच गणवेश घालून शाळेत जावे लागणार आहे. तर वह्या आणि छत्र्या जूनअखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. पालिकेने या वर्षीपासून केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टवरून शालेय वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रखडपट्टी होऊन विद्यार्थ्यांवर ही वेळ आली आहे.
महानगरपालिकेच्या शाळांतील वस्तूंसह टेबल, खुर्च्या आणि कोटय़वधींचे साहित्य आता ‘जेम’ पोर्टलवरून खरेदी करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपच्या अट्टहासामुळे पालिका प्रशासनाने घेतला आहे. ‘जेम’ (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) पोर्टलवरून खरेदी केल्यामुळे किमान 17 टक्के पैशांची बचत होत असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र जूनच्या 12 ते 15 तारखेला शाळा सुरू होणार असल्याचे निश्चित होते. असे असताना किमान तीन महिने आधी खरेदीप्रक्रिया राबवण्यास सुरुवात होणे आवश्यक होते. मात्र शाळा सुरू होण्यास आठवडा राहिला असताना गणवेश, छत्र्या आणि वह्या खरेदीचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात आल्याने विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव म्हणाल्या.
विद्यार्थ्यांची लटकंती
खेळाडू विद्यार्थ्यांना गणवेश वेळेत मिळत नसल्याने पुढील इयत्तेचा किंवा मागील इयत्तेचा गणवेश दिला जातो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचा गणवेश मिळतच नाही. त्यामुळे हे विद्यार्थ्यांची ‘मधल्या’ मापात लटपंती होते, असे नगरसेविका सईदा खान म्हणाल्या.
नव्या सिस्टीमचा फरक नाही
‘जेम’ पोर्टलवर एखाद्या निविदाकाराला काम देण्यासाठी इतर निविदाकारांना अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी केला. त्यामुळे ‘जेम’ पोर्टलवरील खरेदी प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करीत या नव्या पद्धतीचा कोणताही फायदा झाला नसल्याचे ते म्हणाले.



























































