
सोशल मीडियावर तरुणाईला आकर्षित करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके हे हिंदुस्थानात शनिवारी दाखल होणार आहेत. ‘मी हिंदुस्थानसाठी निघालो आहे. मी माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, जय भीम!’ असे म्हणत ते अमेरिकेतून रवाना झाले आहेत. 6 जून रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या निदर्शनांमध्ये ते सहभागी होणार आहेत. मात्र समर्थकांनी दिल्ली विमानतळावर येऊ नये, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकून केले आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतर येथे निदर्शने आयोजित केली आहेत. त्यात सहभागी होणसाठी ते अमेरिकेतून रवाना झाले आहेत. या आंदोलनासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिल्लीत दाखल झाल्यानंतर विमानतळावरून थेट पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊ शांततापूर्ण निदर्शनांसाठी परवानगी घेणार आहे, असे सांगून दीपके यांनी समर्थकांना विमानतळावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र विमानतळावर खूप लोकांनी गर्दी केल्यास अडचण होईल. सुरक्षा यंत्रणा तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, असे वाटते. त्यामुळे समर्थकांनी जंतरमंतर येथे गोळा व्हावे, असे दीपके यांनी म्हटले आहे. पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील या आंदोलनात सहभागी होऊ शकतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच सीजेपीला पाठिंबा जाहीर केला आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी काही दिवसांपूर्वी बेरोजगार तरुणांसंबंधी केलेल्या कॉकरोच टिप्पणीनंतर अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टी स्थापन केल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती.
‘सीजेपी’चे 11 लाखांपेक्षा जास्त सदस्य
‘सीजेपी’ पक्षाचे 11 लाखाहून अधिक नोंदणीकृत सदस्य झाले आहेत. वेबसाईटच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील शनिवारी होणाऱ्या आंदोलनात हजारो समर्थक एकत्र येण्याची शक्यता आहे, असे अभिजित दीपके यांनी म्हटले आहे.


























































