पाऊस आला वेशीपाशी! निपाणीच्या तवंदी घाटात कहर, गोव्याला झोडपले… 48 तासांत महाराष्ट्रात धडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे-बंगळुरू महामार्गावर निपाणीजवळ तवंदी घाटात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने घाटरस्त्याची अक्षरशः नदी झाली. पाण्याच्या लोंढय़ासोबत माती आणि मोठे दगड आल्याने भयंकर स्थिती उद्भवली. यात अनेक वाहनेही अडकून पडली होती.

प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारा मान्सून महाराष्ट्राच्या वेशीपाशी आला आहे. एक-दोन दिवसांमध्ये मान्सून कोकणात दाखल होणार असून लवकरच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत तो दाखल होईल. कोकणात सिंधुदुर्ग जिह्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. याशिवाय कोल्हापूर, अहिल्यानगर, लातूर, परभणी इत्यादी जिह्यांमध्ये हलक्या सरी कोसळल्या.

केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झाल्यानंतर मान्सूनने अतिशय वेगाने कर्नाटकचा बहुतांश भाग व्यापला. त्यानंतर आज मान्सून गोव्यात धडकला. गोव्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तर, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट परिसरात पावसाने अक्षरशः थैमान घातले. या परिसरात ढगफुटी सदृश पावसाने तडाखा दिला. दगड आणि माती वाहून आल्यामुळे रस्त्यावर प्रचंड चिखल झाला.