
महागाईचा आणखी एक झटका सामान्यांना बसला असून केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सलूनसेवेचे दर 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतला आहे. ही दरवाढ उद्यापासूनच राज्यभरात लागू होणार आहे. केस कापण्यासाठी जर 100 रुपये असतील तर त्याजागी आता 120 रुपये तर दाढीसाठी 80 च्या जागी 100 रुपये मोजावे लागतील.
युद्धामुळे झालेल्या इंधन दरवाढीचा फटका सलून व्यवसायालाही बसला आहे. सलूनसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळेच सलूनमधील सर्व सेवांचे दर 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय नाभिक महामंडळाकडून घेण्यात आला आहे.
100च्या जागी 120 रुपये मोजावे लागणार
प्रीमियम, एसी, साधे सलून तसेच ग्रामीण भागातील सलून यासाठी नव्याने दरपत्रक दिले जाणार आहे. प्रीमियम सलूनमध्ये सध्या दाढीसाठी 200 ते 500 रुपये, एसी सलूनमध्ये 100 ते 200 रुपये, साध्या सलूनमध्ये 50 ते 80 रुपये तर ग्रामीण भागात 50 ते 70 रुपये घेतले जातात. तर केस कापण्यासाठी प्रिमियम- 500 ते 1000, एसी सलून- 150 ते 350, साधे सलून- 150 ग्रामीण भागातील सलून- 80 ते 100 रुपये घेतले जातात.


























































