किडनी घ्या, पण कर्जमाफी द्या! जाचक अटींमुळे हतबल शेतकऱ्यांचा आक्रोश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुती सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना असून बुलढाणा येथील शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांकडे जाऊन माझी किडनी घ्या, पण कर्ज द्या असे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले.

बुलढाणा जिह्यातील मोताळा तालुक्यातील आव्हा गावचे 35 वर्षीय शेतकरी शुभम घोंगटे यांनी स्वतःची किडनी विकून कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य शासनाने जीआर काढला. पण त्या जाचक अटींमध्ये आम्ही बसत नाही, त्यामुळे आमची किडनी घ्या पण कर्ज द्या, असे त्यांनी स्टॅम्प पेपरवर दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून विरोधकांनी त्यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

शेतीच्या मालाला भाव नाही. त्यामुळे आम्ही कर्ज भरु शकत नाही. 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती, त्यांना वगळून फक्त 50 हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान देऊ, असा अध्यादेश सरकारने काढला आहे. आमची किडनी घ्या. त्यातून उरलेले कर्ज फेडतो. पैसे उरले तर इतर शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा लाभ द्या. – शुभम घोंगटे, शेतकरी

किमान रक्ताची किंमत करा! – वडेट्टीवार

शेतकरी इतका हतबल झाला आहे की आता त्याला स्वतःचे अवयव विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली नाही, हमीभाव मिळाला नाही, उत्पादन खर्च भरून निघाला नाही आणि कर्जाचा डोंगर मात्र वाढतच चालला आहे. घामाची किंमत देता आली नाही, किमान रक्ताची किंमत करा, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

छुप्या मार्गाने कर्जवसुली सुरू – रोहित पवार 

सरकारने कर्जमाफी दिलेली नाही तर अटी-शर्ती टाकून छुप्या मार्गाने कर्जवसुली सुरू केली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केली. सरकारने  शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.