हुकलेल्या ऑलिम्पिकवारीचे स्वप्न सत्यात उतरवणार, जागतिक फायनलमध्ये पोहोचलेली दिया पहिली हिंदुस्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद लाड

आयुष्यात चढउतार येत असतात, होत्याचं नव्हतं होतं आणि माणूस निराशेच्या गर्तेत अडकतो. आपण जे स्वप्न पाहत होतो, ज्यासाठी घाम गाळला, अथक मेहनत घेतली ते स्वप्न समोर येतं आणि बेचिराख होतं, याहून वाईट ते काय. पण तिने हार मानली नाही. हुकलेले स्वप्न घडवण्यासाठी आता दिवसेंदिवस झटत आहे. आपले ऑलिम्पिकवारीचे स्वप्न पुन्हा साकारण्यासाठी हिंदुस्थानची टेबल टेनिस खेळाडू दिया चितळे सज्ज आहे. जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालेली ती हिंदुस्थानची पहिलीच खेळाडू ठरली आहे.

वय वर्ष अवघे आठ. शाळेतच दियाला टेबल टेनिसची गोडी लागली. पण ती फक्त हौस म्हणूनच खेळायची. पण 12 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत ती उतरली आणि रौप्यपदक तिने पटकावलं अन् त्यानंतर आपण टेटेमध्येच कारकीर्द करायची हे ठरवलं. आपल्या कारकीर्दीला प्रोफेशनल जोड हवी यासाठी तिने जर्मनी गाठलं. तिथे पीटर अँगल यांचं मार्गदर्शन तिला मिळालं आणि तिने यशाची शिखरं पादाक्रांत करायला सुरुवात केली.

15 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत ती दोनदा चॅम्पियन ठरली, 18 वर्षांखालील स्पर्धेतही तिने जेतेपद जिंकलं. 21 वर्षांखालील स्पर्धेत दोनवेळा तिने विजेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर खुल्या महिलांच्या गटात तिने आपली यशाची पताका उंचावत सुवर्णपदक जिंकलं. हे राष्ट्रीय स्पर्धेत सुरू होतं, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्येही तिने दमदार यश मिळवलं. एकामागून एक यशाचे शिखर ती चढत होती. आता लक्ष्य होतं ते फक्त 2024 सालचं ऑलिम्पिक.

ऑलिम्पिकची तयारी करतानाच तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं. आपली मेहनत वाया जाणार असं तिला वाटत होतं. पण ऑलिम्पिकचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. शरीर साथ देत नव्हतं तरीही ती राष्ट्रीय स्पर्धेत खेळली, मनासारखी कामगिरी झाली नाही, तिची ऑलिम्पिकवारी हुकली. हे दियाच्या आयुष्यातील नाजूक वळण होतं, जिथे ती खचली असती तर आता खेळू शकली नसती. पण दिया निर्धाराने उभी राहीली. परिस्थितीवर मात करत पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाली.

दियाने गेल्या वर्षी टय़ुनिशियातील जागतिक स्पर्धेत पुन्हा एकदा देदीप्यमान यश संपादन केलं. या वर्षाच्या सुरुवातीला मस्कतमध्ये मिश्र दुहेरीत मनुश शहाबरोबर खेळताना त्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरलं. काही दिवसांपूर्वी लागोसमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा सुवर्णपदकाला गवसणी घातली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक टेबल टेनिस फायनल्समध्ये हिंदुस्थानकडून प्रथमच पात्र ठरण्याचा मान दियाला मिळाला आहे.

आपल्या आयुष्यातील चढउतारांबद्दल दिया म्हणाली की, ‘एकामागून एक यश मिळत होते. ऑलिम्पिकची तयारी सुरू असताना पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं त्यामुळे माझं ऑलिम्पिकचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही, पण मी खचले नाही. पुन्हा एकदा त्वेषाने उभी राहीली अन् आता जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा देशातून पहिला मान मला मिळाला आहे. पण पुन्हा एकदा माझं मनं मला घेऊन जातंय ते 2028 ऑलिम्पिककडे. ऑलिम्पिकमध्ये देशाची मान उंचावण्यासाठी मी सज्ज असेन.’