सामना अग्रलेख – लोकशाहीचा ‘खेला होबे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी-शहांनी देशाच्या लोकशाहीला एक प्रकारे ग्रहण लावले आहे. पक्ष फोडण्याची व गैरमार्गाने सत्तेवर टिकून राहण्याची नशा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात काही चुका झाल्या असतील, पण म्हणून त्यांचा पक्ष लिलावात काढण्याचा अधिकार कोणालाच नाही. ममता बॅनर्जी यांचे सरकार मुसलमानधार्जिणे होते असा भाजपचा दावा असेल तर भाजपचे सरकारही हिंदुत्ववादी, संस्कृतीला धरून नाही. त्यांचे सरकार चोऱ्या करून आले व सत्ता टिकवण्यासाठी ते आता इतर पक्षांवर दरोडे टाकत आहे. भारतीय लोकशाहीचेही धिंडवडे निघत आहेत. ते धिंडवडे किती काळ पाहत बसायचे?

पश्चिम बंगालात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर लगेच ‘खेला होबे’ घडले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा अनपेक्षित पराभव झाला. ममता बॅनर्जी स्वतः त्यांच्या भवानीपूर मतदारसंघात हरल्या, पण त्यानंतर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल पक्ष विधानसभेत व लोकसभेत उभा-आडवा फोडला गेला. कोणी एक ऋतब्रत बॅनर्जी या तरुण आमदाराच्या नेतृत्वाखाली 60 आमदारांनी बंड केले (जसे तेव्हा महाराष्ट्रात घडले) व आमचाच तृणमूल पक्ष खरा असा दावा त्याने विधानसभेत केला. ममता बॅनर्जींकडे आता 20 आमदार उरले आहेत. त्यातलेही अर्धे फुटण्याच्या मार्गावर आहेत. आधी बंगालची सत्ता गेली व लगेच स्वतः उभा केलेला पक्षही हातून गेला, तोही एका ऐऱ्यागैऱ्याकडून. महाराष्ट्रात शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेसच्या बाबतीत भाजपने हेच केले. शिवसेना पक्ष व चिन्ह धनुष्यबाण कुण्या एका मिंध्याला सोपवले व शरद पवारांच्या हयातीत त्यांनीच निर्माण केलेला पक्ष त्यांच्या डोळ्यांदेखत अजित पवारांकडे सोपवला. ममता बॅनर्जी यांनाही आता याच परिस्थितीचा सामना करावा लागेल. प. बंगाल विधानसभेत भाजपचे बहुमत आहे व विधानसभेचे अध्यक्ष दोन दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा करून मोदी-शहांना भेटून आले. त्यामुळे विधानसभेत पक्षांतर बंदी कायद्यावर डोके आपटून उपयोग नाही. जे महाराष्ट्राने अनुभवले तेच बंगालात घडेल. निवडणूक आयोग मोदी-शहांच्या गुह्यातील ‘पार्टनर’ आहे व सुप्रीम कोर्ट त्यांच्याच घरगडय़ासारखे वागत असल्याने जे शिवसेना-राष्ट्रवादी काँगेसच्या बाबत घडले त्याच रांगेत न्यायासाठी ममता बॅनर्जी यांनाही उभे राहावे लागेल. भारतीय भूमीवर राजकारणाचा जो किळसवाणा खेळ सुरू आहे त्याचे हे भयंकर स्वरूप आहे. आधी महाराष्ट्र व आता

पश्चिम बंगालातील निवडणुका

भाजपने सरळ मार्गाने जिंकल्या नाहीत. निवडणूक जिंकल्यावर प्रादेशिक पक्षांचे आमदार फोडले. देशाची वाटचाल फक्त ‘एकच पक्ष एक निवडणूक’ या दिशेने चालली आहे. प्रादेशिक पक्षांचे स्थान राहू नये व राज्यांचा आवाज पूर्णपणे बंद करण्याचे हे कारस्थान चिंताजनक आहे. सत्तेचा अमर्याद गैरवापर, पैशांचा वापर आणि दहशतवाद या पद्धतीने निवडणुका ताब्यात घ्यायच्या, सत्तेवर टिकून राहायचे असे लोकशाहीचे नवे तंत्र भारतात निर्माण झाले. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदार-खासदारांना सरळ विकत घ्यायचे व वॉशिंग मशीनमध्ये टाकून पवित्र करायचे या उद्योगाला पंतप्रधान मोदी यांनी जणू कायदेशीर मान्यता दिली आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली तृणमूलचे 60 आमदार ‘बंड’ करत आहेत तो ऋतब्रत बॅनर्जी कोण आहे? जेमतेम 35 वर्षांचा हा पोरगा आधी प. बंगालच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात होता. तेथे त्याने घोटाळे केले. तो तृणमूलमध्ये आला. ममता बॅनर्जी यांनी त्याला राज्यसभेत पाठवले व आता विधानसभेत निवडून आणले. तो म्हणतो, ‘मीच तृणमूलचा मालक’ व भाजप ते विधानसभेत मान्य करत आहे. अमित शहांनी पेरलेले हे विष आहे. निवडून आलेले आमदार फुटले म्हणून ममता बॅनर्जी या तृणमूल पक्षाच्या नेत्या नाहीत, असा विचार करणे व त्या फुटीर गटास तृणमूल म्हणून मान्यता देणे हा भ्रष्टाचार आहे, पण महाराष्ट्रात अशाच पद्धतीने ‘म्हातारी’ मारण्यात आली. तो काळ सोकावत प. बंगालात पोहोचला. काळ सोकावला आहे हेच खरे. महाराष्ट्राच्या आधी बिहारात चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती, पंजाबात अकाली दल, केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष भाजपने

याच ‘पॅटर्न’ने

तोडला. प. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी म्हणतात, ‘राज्यात कायद्याचे राज्य सुरू झाले आहे.’ तृणमूल काँगेसचे आमदार फोडून उत्सव साजरा करणे हे कायद्याच्या राज्यात बसते काय? तृणमूलच्या खासदारांवर हल्ले करणे याला कायद्याचे राज्य कसे म्हणावे? विधानसभेचे अध्यक्ष हे निष्पक्ष असायला हवेत, पण महाराष्ट्राच्या निकालात विधानसभा अध्यक्ष हे पक्षपाती वागले. प. बंगालातही तेच चित्र दिसेल. मोदी-शहांनी देशाच्या लोकशाहीला एक प्रकारे ग्रहण लावले आहे. पक्ष फोडण्याची व गैरमार्गाने सत्तेवर टिकून राहण्याची नशा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात काही चुका झाल्या असतील, पण म्हणून त्यांचा पक्ष अशा पद्धतीने लिलावात काढण्याचा अधिकार कोणालाच नाही. ममता बॅनर्जी या मुस्लिमधार्जिण्या होत्या म्हणून त्यांचा पराभव झाला हे भाजपचे विश्लेषण बरोबर नाही. आता भाजपचे राज्य प. बंगालात आले ही पं. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली असल्याचे सांगणे हिंदुत्वाची व भारतीय स्वातंत्र्य लढ्याची विडंबना आहे. श्यामाप्रसाद हे बंगालमधील मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सामील होते. स्वातंत्र्य लढ्यातील ‘चले जाव’सारख्या आंदोलनास त्यांनी विरोध केला होता व हे आंदोलन निर्दयीपणे चिरडून टाका असे पत्र त्यांनी इंग्रज सरकारला लिहिले होते. त्यामुळे भाजपने प. बंगालातले त्यांचे सरकार पंडित श्यामा प्रसाद मुखर्जींना अर्पण करणे हिंदुत्वास शोभत नाही. दुसरे म्हणजे, सरकार येताच प. बंगालात गायी कापण्याची परवानगी भाजपने दिली व ही कायदेशीर मान्यता आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार मुसलमानधार्जिणे होते असा भाजपचा दावा असेल तर भाजपचे सरकारही हिंदुत्ववादी, संस्कृतीला धरून नाही. त्यांचे सरकार चोऱ्या करून आले व सत्ता टिकवण्यासाठी ते आता इतर पक्षांवर दरोडे टाकत आहे. भारतीय लोकशाहीचेही धिंडवडे निघत आहेत. ते धिंडवडे किती काळ पाहत बसायचे?