‘सीटीस्कॅन’, ‘एमआरआय’साठीच्या वेटिंगवरून स्थायी समितीत खडाजंगी, शिवसेनेसह सत्ताधाऱ्यांकडूनही संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या मोठ्या रुग्णालयांत ‘सीटीस्कॅन’, ‘एमआयआर’साठी एक ते दीड महिना वेटिंगवर राहावे लागत असल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे सांगत आज स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेसह विरोधक, सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रुग्णालयांचे कोट्यवधीच्या प्रस्तावांना स्थायी समिती मंजुरी देत असताना प्रशासनाकडून मात्र रुग्णांना आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला.

पालिकेच्या केईएम रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी रुग्ण वेटिंगवर असतात. सिमेन्स हेल्थ केअर कंपनीने या आधीही मशीनचा पुरवठा केला आहे. आता या मशीनची गॅरंटी किती वर्षे, मशीन कालबाह्य झाल्या आहेत का, नवीन मशीन किती वर्षे चालणार, असा सवाल शिवसेनेचे यशोधर फणसे यांनी उपस्थित केला. एमआरआय, सीटीस्कॅनसाठी रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे नगसेविका श्रद्धा जाधव म्हणाल्या. तर रुग्णालयांच्या गैरसोयींचा पर्दाफाश करण्यासाठी सरप्राईज व्हिजिट देऊन तपासणी करा, अशी मागणी शिंदे गटाचे अमेय घोले यांनी केली. यावेळी रुग्णालयांच्या प्रश्नांवर विशेष बैठक घेण्याची मागणीही सदस्यांकडून करण्यात आली. एमआरआय करणाऱ्या रुग्णांना मोबाईवर बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जमीर कुरेशी यांनी केली. एमआरआय करण्याआधी सीटीस्कॅन करावे लागते मात्र सीटीस्कॅनच बंद असते, असे यामिनी जाधव म्हणाल्या.
वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी धोरण ठरवा
प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये एकच मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे उपनगरीय रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी डॉ. सईदा खान यांनी केली. तर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी विशेष धोरण तयार करा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर असल्याचे सांगत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी एमआरआय खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला.