
महायुती सरकारने महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आजी-माजी आमदार, खासदारांसह समाजसेवक आणि महिती अधिकार कार्यकर्ते अशा 22 जणांची सुरक्षा अचानक काढून घेतली आहे.
शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी, माजी आमदार ऋतुजा लटके, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, विलास पोतनीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यासह समाजसेवक, माहिती अधिकार कार्यकर्ते यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. पोलीस संरक्षण काढून घेतल्याचे पत्र आपल्याला वाकोला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून पाठवण्यात आले असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.
संरक्षण पुनर्विलोकन आढावा समितीच्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर आपली पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे असे त्या पत्रामध्ये कारण देण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे महायुतीशी संबंधित आजी-माजी लोकप्रतिनिधींची सुरक्षा मात्र कायम ठेवण्यात आल्याचे समजते.


























































