भाजपनं मला तोंड उघडायला लावू नये; विधान परिषदेतील घोडेबाजारावर सुप्रिया सुळे आक्रमक, संसदेत मांडणार भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणतीही रंगत दिसत नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे रंगत नाही. प्रचंड घोडेबाजार सुरू आहे. घोडेबाजार होणार म्हणून पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून महाविकास आघाडीने माघार घेतली, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्या पुण्यात बोलत होत्या.

भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मी संस्कृतपणे काही बोलत नाहीय. कारण माझा तो स्वभाव नाही. विधासभा आणि लोकसभेत त्यांच्या विरोधात ताकदीने लढू. पण आता जो घोडेबाजार झालाय या बऱ्याच गोष्टी तुम्हाला आणि मलाही माहिती आहेत. हा घोडेबाजार होऊ नये म्हणून मी बील मांडणार आहे. कुठलीही निवडणूक फक्त पैशाच्या जीवावर कुणी लढू नये किंवा आयटी, सीबीआय आणि ईडीची भीती दाखवू नये, असेही त्या म्हणाल्या.

देश लोकशाही मार्गानेच चालला पाहिजे आणि लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ही निवडणूक मला फारशी रंगतदार वाटली नाही. खरी रंगत ही लोकसभा, विधानसभा किंवा पालिका निवडणुकांमध्येच पाहायला मिळते, असेही त्या म्हणाल्या.

विधान परिषदेचा, मतदानाचा आणि या निवडणुकीचा काहीही संबंध नाही. मी स्वत: लोकसभेत बील मांडणार आहे. एकतर हे इलेक्शन बंद करा, नाहीतर ओपन व्होटिंग करा. हे घोडेबाजार आणि हे असले उद्योग बंद झाले पाहिजे. हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तसेच निवडणूक आयोगाकडेही जाणार असून वेळ पडल्यास या सगळ्या प्रक्रियेवर कोर्टातही जाईल, असेही त्या म्हणाल्या.

घोडेबाजाराचे पुरावे द्यायचे माझी तयारी आहे. मुख्यमंत्री म्हणतील तिथे येऊन पुरावे द्यायची तयारी आहे. अनेक गोष्टी होत असतात आणि पुराव्यासह ते समोर आणायचे असतात. कारण नुसता दगड मारून पळण्यात मजा नाही. पैशाचे वाटप होईल, मोठा घोडेबाजार होईल अशी चर्चा माध्यमांत होती आणि कार्यकर्त्यांनाही ऑफर आल्या होत्या. या गोष्टी होऊ नयेत या मताची मी आहे. कॉपी करून पास होण्यात काहीही मजा नाही, असेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र सरकार हे कमालीचे असंवेदनशील असून ते राज्यातील जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. सध्या देश आणि महाराष्ट्र दोन्हीही मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून, आगामी काळात राज्यासमोर मोठी आर्थिक आव्हाने उभी ठाकणार आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.