विरारच्या नारंगी ग्रामस्थांचा रस्ता रेल्वेने अडवला, रेल्वे फाटक बंद केले; गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरारच्या नारंगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे फाटक नागरिकांसाठी बंद केल्याने मोठी अडचण झाली आहे. कित्येक वर्षांपासून वाहतुकीसाठी सुरू असलेला रस्ता पश्चिम रेल्वेने अचानक अडवल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आधी भुयारी मार्ग किंवा पादचारी पूल उपलब्ध करून द्यावा मगच फाटक बंद करा अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

विरार येथील वाहतूककोंडी संपुष्टात यावी यासाठी रेल्वेने नारंगी येथे रेल्वे उड्डाणपूल उभारला. ८ मे रोजी या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र त्यानंतर लगेचच डागडुगीचे कारण देऊन नारंगी फाटक बंद करण्यात आले. मात्र आता ग्रामस्थांना कोणतीही पूर्व कल्पना न देता रेल्वे प्रशासनाने फाटक परिसरात लोखंडी खांब उभारण्याचे काम सुरू केले. फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा रेल्वेने निर्णय घेतल्याचे समजताच नारंगी गावासह आजूबाजूच्या भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केला. या फाटक मार्गाचा वापर दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक करत असल्याने फाटक बंद झाल्यास गावकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांची गैरसोय टाळून पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आदेश नसताना लोखंडी खांब उभारले

रस्ता बंद करण्याबाबत रेल्वे प्रशासनाचे कोणतेही आदेश नसताना फाटक बंद कारण्यासाठी लोखंडी खांब उभारले जात असल्याबाबत वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजिव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. या विषयावर सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून नागरिकांसाठी मार्ग खुला ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. रेल्वे प्रशासनाने संबंधित जागेसाठी मोबदल्याची मागणी केली तरी महानगरपालिका त्यासाठी निधी देण्यास तयार असून नागरिकांच्या हितासाठी हा मार्ग कायम खुला ठेवला जाईल असेही त्यांनी सांगितले.