
सर्वसामान्यांची आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी महामंडळाची लालपरीची सध्या सर्वत्र दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. कधी काळी सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी बसेसची अवस्था आता अत्यंत दयनीय, तुटकी आणि मोडकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वातानुकूलित आणि आरामदायी शिवशाही बसेसचे मोठे कौतुक केले गेले, त्या शिवशाही बसेस सुद्धा आज भंगार अवस्थेत रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली केवळ प्लास्टिक पट्ट्यांची ठिगळे मारून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यातील बहुतांश गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अनेक बसेसच्या खिडक्यांच्या काचा निखळल्या आहेत, तर काही गाड्यांना दरवाजेच नीट नाहीत. पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी प्रवास करताना प्रवाशांना वाऱ्या-पावसाचा थेट सामना करावा लागत आहे. अनेक आगारांमध्ये या तुटक्या व मोडक्या भागांवर साधी डागडुजी करण्याऐवजी चक्क प्लास्टिकच्या पट्ट्या मारून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. हा अजब जुगाड पाहून प्रवाशांनी महामंडळाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या दुरवस्थेतून महामंडळाची हायटेक मानली जाणारी शिवशाही बस देखील सुटलेली नाही. दैनिक प्रवासात अधिक पैसे मोजूनही प्रवाशांना शिवशाहीमध्ये नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. शिवशाही बसेसचे आतील सिट्स फाटलेल्या आणि मोडलेल्या अवस्थेत आहेत. खिडक्यांचे चॅनेल्स निकामी झाल्यामुळे काचांचा सतत खुळखुळा आवाज येत राहतो. बाहेरील फायबरचे भाग तुटल्यामुळे महामार्गावर धावताना या गाड्यांमधून विचित्र आवाज येतात. कधीकाळी दिमाखात धावणारी शिवशाही आज प्रशासनाच्या पूर्ण दुर्लक्षामुळे दैनशाही झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नियम पाहता, ज्या गाड्यांची स्थिती उत्तम आहे अशाच गाड्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर सोडणे अपेक्षित असते. परंतु, आगारांमधील ढिसाळ नियोजनामुळे मोडक्या आणि खुळखुळा झालेल्या बसेस थेट लांब पल्ल्यांच्या मार्गांवर धावण्यासाठी सोडल्या जात आहेत. तीनशे ते पाचशे किलोमीटरच्या प्रवासासाठी अशा खिळखिळ्या झालेल्या गाड्या दिल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्यरात्री किंवा निर्जन स्थळी या बसेस बंद पडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल होत आहेत.
महामंडळाकडे नवीन बसेस कधी येणार आणि असलेल्या बसेसची योग्य दुरुस्ती कधी होणार, असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. भाडेवाढ नियमितपणे केली जाते, मात्र प्रवाशांना सुविधांच्या नावाखाली केवळ धक्के आणि खिळखिळ्या गाड्याच मिळतात. शिवशाहीचे तिकीट अधिक असूनही गाडीत साधी खिडकी नीट नसते आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात गाडी कधी बंद पडेल याचा नेम नसतो, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे. एसटी महामंडळ या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन आपल्या जीवनवाहिनीला नवसंजीवनी देणार की प्रवाशांना अशाच खुळखुळ्या गाड्यांमधून धोकादायक प्रवास करावा लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

































































