
ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात तब्बल २४ बोगस डॉक्टर असल्याचे जाहीर केले असून तसे पत्रच उपमहापौर कृष्णा पाटील यांना दिले आहे. मात्र दिवसेंदिवस ‘मुन्नाभाई’ची संख्या वाढत असताना महापालिका कारवाई करत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सर्वसामान्यांचा बळी गेल्यानंतर प्रशासन आणि सत्ताधारी जागे होणार का, असा सवाल विचारला जात आहे.
प्रभाग समिती निहाय डॉक्टरांची विशेष पथके नेमण्यात आली आहेत. या पथकाच्या माध्यमातून क्लिनिक व दवाखान्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते.
आरोग्य विभागाच्या तपासणीत दोषी आढळून येणाऱ्या बोगस डॉक्टरांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नावे, पत्ते पालिकेने जाहीर करावे
ठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण १ हजार ७६७ खासगी दवाखाने आहेत. त्यातील १ हजार ४५१ दवाखान्यांची तपासणी महापालिकेच्या विशेष पथकाकडून करण्यात आली असल्याचे पत्र पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील यांनी उपमहापौर कृष्णा पाटील यांना दिले आहे. दरम्यान या बोगस डॉक्टरांची नावे, त्यांचे पत्ते पालिकेने जाहीर करावे, अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे.
घोडबंदरमध्ये सर्वाधिक बोगस डॉक्टर
दिव्यात दररोज नवनवीन दवाखाने सुरू होत आहेत. अख्ख्या दिव्यात ५ तर सर्वाधिक माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती हद्दीत ६ बोगस डॉक्टर आहेत. तर झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या लोकमान्य, सावरकरनगर प्रभाग समिती हद्दीत एकही बोगस डॉक्टर नसल्याने पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रशचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
- मुंबईलगतचे आणि सर्वात महत्त्वाचे शहर असलेल्या ठाणे शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याची बाब पुन्हा उघडकीस आली. या बोगस डॉक्टरांनी घोडबंदरसह ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये आपले दवाखाने थाटले आहेत.
- ठाणे पालिकेच्या मागील महासभेत शहरातील बोगस डॉक्टरांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नेमणूकदेखील करण्यात आली असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला होता.
- या पथकाकडून प्रभाग समिती निहाय कारवाई करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची संपूर्ण माहिती उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आरोग्य विभागाकडे मागितली. त्यानुसार १३ मार्च ते १८ मे या कालावधीत २४ संशयित बोगस डॉक्टर असल्याची कबुली आरोग्य विभागाने दिली आहे.
































































