
दिल्लीतील मालवीयनगर भागातील एका हॉटेलमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर राजधानी दिल्लीतील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्ली सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 6 वर्षांत म्हणजेच 2019 ते मार्च 2025 पर्यंत दिल्लीतील आगीच्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तब्बल 543 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दिल्लीतील मालवीयनगर येथील एका अरुंद गल्लीत असलेल्या ‘फ्लरिश स्टेज् बी अँड बी’ हॉटेलला बुधवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत 21 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये बहुतांश परदेशी नागरिकांचा समावेश होता. याशिवाय 25 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेव्यतिरिक्त, नुकत्याच विवेक विहार आणि पालम भागात झालेल्या आगीच्या वेगवेगळ्या घटनांमध्येही अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, दिल्लीत वर्षागणिक आगीच्या घटना आणि त्यांमधील मृतांची संख्या चिंताजनक ठरत आहे. चालू वर्षाच्या, म्हणजेच 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांतच 65 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी2025-26 मध्ये 84, 2024-25 मध्ये 90 आणि 2023-24 मध्ये 77 लोकांचा आगीमुळे मृत्यू झाला होता. तसेच 2022-23 मध्ये 95, 2021-22 मध्ये 55 आणि 2020-21 मध्ये 41 मृत्यूंची नोंद झाली होती.
गेल्या काही वर्षांत 2019-20 या वर्षात सर्वाधिक मृत्यू झाले होते. त्यावेळी दिल्लीतील ‘अनाज मंडी’ भागात लागलेल्या आगीत 44 लोकांना जीव गमवावा लागला होता. 1997 मधील ‘उपहार सिनेमा’ दुर्घटनेत 59 मृत्यू झाले होते, त्यानंतर हे दिल्लीतील सर्वात मोठे अग्निकांड मानले जाते.
जीवितहानीसोबतच 2019 ते 2025 या काळात आगीच्या घटनांमुळे 4,403 लोक गंभीर जखमी झाले आहेत. दुसरीकडे दिल्ली फायर सर्व्हिसेसकडे येणाऱ्या आपत्कालीन कॉल्सच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये अग्निशामक दलाला 17,231 कॉल्स आले होते, जी संख्या गेल्या आर्थिक वर्षात वाढून थेट 20,379 वर पोहोचली आहे. वाढती लोकसंख्या, शहरांमधील अरुंद गल्ल्या आणि अग्निसुरक्षेच्या नियमांचे होणारे उल्लंघन यांमुळे दिल्लीत आगीचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.



























































