
राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या बहुचर्चित पेद्दी चित्रपटाभोवती नव्या वादाने जोर धरला आहे. चित्रपटातील जान्हवी कपूरच्या काही दृश्यांवर सोशल मीडियावर तीव्र टीका होत असून, अभिनेत्रीचे चित्रण महिलांना दुय्यम ठरवणारे असल्याचा आरोप प्रेक्षकांच्या एका गटाकडून करण्यात आला आहे. वाढत्या नाराजीनंतर चित्रपटाचे दिग्दर्शक बूची बाबू सना यांनी जाहीरपणे माफी मागितली असून वादग्रस्त दृश्यांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात बुची बाबू सना यांनी सांगितले की, सिनेमाचे उद्दिष्ट प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण करणे हे असते. कोणत्याही व्यक्तीला किंवा विशेषतः महिलांना दुखावण्याचा अथवा त्यांचा अपमान करण्याचा हेतू चित्रपट निर्मितीमागे नव्हता. मात्र, काही दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल ते मनापासून दिलगिरी व्यक्त करतात. असे वृत्त आज तक ने दिले आहे.
दिग्दर्शकांनी स्पष्ट केले की, चित्रपटाविषयी आलेल्या अभिप्रायाचा गांभीर्याने विचार करण्यात आला असून संबंधित दृश्यांचे पुनर्मूल्यांकन सुरू आहे. प्रेक्षकांच्या भावना आणि बदलत्या सामाजिक मूल्यांचा आदर राखत काही दृश्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. प्रत्येक महिला पात्राचे सन्मानपूर्वक आणि प्रभावी चित्रण व्हावे, यासाठी चित्रपट निर्माते कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, चित्रपटावरील वाद सुरू असतानाच बॉक्स ऑफिसवर पेद्दीची घोडदौड कायम आहे. ग्रामीण पार्श्वभूमी आणि क्रीडा विषयावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत चित्रपटाने जागतिक स्तरावर दमदार कमाई केल्याचे समोर आले आहे.
चित्रपटात राम चरण एका संघर्षशील तरुणाची भूमिका साकारत असून, गावाच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी त्याची लढाई कथानकाचा मुख्य गाभा आहे. जान्हवी कपूर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसत असून, तिच्या पात्राभोवतीच सध्या वाद निर्माण झाला आहे.





























































