सरकारनं AI चा वापर केला असता तर ही वेळच आली नसती, नीट पेपरफुटीवरून शरद पवार यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी लागणाऱ्या नीट परीक्षेतील पेपरफुटीवरून वातावरण कमालीचे तापलेले आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) नियोजनात जर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा योग्य वेळी वापर केला असता, तर आज देशावर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारचे कान टोचले आहेत. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

एआयच्या वापरामुळे नीट पेपरफुटीचे प्रकरण रोखू शकता आले असते का? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, जर हे पाऊल आधीच उचलले गेले असते, तर आज विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले नसते. आज शेतीपासून ते आरोग्य सेवेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात एआयमुळे मोठे क्रांतीकारक बदल घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर तातडीने आणि वेगाने वाढवण्याची गरज आहे.

सध्या राष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाचा तपास हाताळण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर सोपवण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यासोबत मी भूतकाळात काम केले आहे. ते अत्यंत सक्षम अधिकारी असून, येत्या दोन महिन्यांत त्यांच्या कामाचे रिझल्ट देशासमोर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपनं मला तोंड उघडायला लावू नये; विधान परिषदेतील घोडेबाजारावर सुप्रिया सुळे आक्रमक, संसदेत मांडणार भूमिका