Kokan News – कोकणात भात पेरणीला सुरुवात; शेतकरी कुटूंब शेतीच्या कामात मग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. भात हे कोकणातील प्रमुख पीक असल्याने शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतीच्या कामात गुंतले असून अनेक ठिकाणी पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीची कामे सुरू झाली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अधून मधून झालेल्या पावसामुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी, कुळवणी तसेच भात बियाण्यांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील शेतांमध्ये सकाळपासूनच शेतकरी आणि शेतमजुरांची लगबग पाहायला मिळत आहे.

यंदा वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाल्यास भात उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, खत व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मान्सूनच्या सरी आल्यास भात पेरणीच्या कामांना आणखी गती मिळणार असून कोकणातील शेतकरी वर्ग आशावादी वातावरणात खरीप हंगामाची तयारी करत आहे.