
नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील घोटाळ्यांच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जंतर-मंतरवर तरुणांच्या जथ्थेच्या जथ्थे दाखल झाले असून सरकार विरोधात निदर्शने सुरू आहेत. परीक्षांवरून उडालेल्या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
हा लढा केवळ एका दिवसाचा नसून तो प्रदीर्घ चालणारा आहे. गेल्या महिन्याभरापासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. परंतु, ठोस कारवाई करण्याऐवजी सरकार केवळ जनतेचे लक्ष भरकटवण्याचे प्रयत्न करत आहे. आमचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करून त्यावरील पोस्ट डिलीट करण्यात आल्या. तुम्ही आमच्या सोशल मीडियावरील पोस्ट हटवू शकता, पण जंतर-मंतरवरील हा जनसागर आणि आमच्या मनातील आक्रोश कसा मिटवणार? असा सवाल उपस्थितांना संबोधित करताना अभिजित दीपके यांनी केला. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्यांनी पाच मागण्याही मांडल्या. ‘एबीपी न्यूज‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
मी अमेरिकेत जाताना माझी आई जेवढी रडत नव्हती, तेवढी तिकडून परत येताना रडत होती; कारण सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जातं, अभिजित दीपके यांचा हल्लाबोल pic.twitter.com/0w0CqOg00R
— Saamana Online (@SaamanaOnline) June 6, 2026
शिक्षण क्षेत्रातील डिजिटलायझेशनपूर्वी शिक्षकांना योग्य प्रशिक्षणाची अट
बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रात वेगाने डिजिटलायझेशन होत आहे, परंतु सायबर गुन्हे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. बँक फ्रॉडप्रमाणेच आता शिक्षण क्षेत्रातही याचे दुष्परिणाम दिसत आहेत. त्यामुळे कोणतीही डिजिटल प्रणाली लागू करण्यापूर्वी शिक्षकांना त्याचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात यावे, राधेश्याम कैथल म्हणाले.
मणिपूरमधील शिक्षण व्यवस्था पूर्ववत करा
गेल्या तीन वर्षांपासून मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून शाळा-कॉलेज पूर्णपणे कोलमडली आहेत. तेथील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याने मणिपूरमधील शिक्षण व्यवस्था तातडीने पूर्ववत करण्याची मागणी मणिपूरच्या विन्सन यांनी केली.
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणा
माझा नातेवाईक कोट्यात राहून गेल्या 3 वर्षांपासून अत्यंत कठीण परिश्रम घेत होता. परंतु, पेपर लीक झाल्यामुळे त्याचे मनोबल पूर्णपणे खचले आहे. परीक्षा पद्धतीतील विश्वासार्हता आणि निष्पक्षता परत आणण्यासाठी सरकारने कठोर कायदे करावेत, अशी मागणी जयपूरहून आलेल्या गायत्री सिंग यांनी केली.
विद्यार्थी आणि पालकांच्या मूळ समस्यांकडे लक्ष द्या
सुरुवातीला या आंदोलनात सहभागी होण्याबाबत मी द्विधा मनःस्थितीत होता. परंतु, ही संघटना थेट विद्यार्थी आणि पालकांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांना हात घालत असल्याचे पाहून तो स्वतःहून आंदोलनात सामील झालो, असे दिल्लीचा 18 वर्षीय तरुण रॉनक कुमार याने सांगितले.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी घ्या
हे आंदोलन सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता आता रस्त्यावर उतरले आहे. परीक्षेतील घोळ आणि मानसिक दबावामुळे अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत असून काहींनी आत्महत्या केल्या आहेत. या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण? याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे, असे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ सुगंधा म्हणाल्या.

























































