IND Vs AFG Test – केएल राहुल-शुभमन गिलचं खणखणीत शतक; पहिला दिवस हिंदुस्थानने गाजवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान या उभय संघांमध्ये कसोटी मालिकेतील एकमेव कसोटी सामन्याला महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली असून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना चोपून काढलं आहे. टीम इंडियाने दिवसाअखेर 3 गड्यांच्या मोबदल्यात 368 धावा चोपून काढल्या आहेत. केएल राहुल (100) आणि कर्णधार शुभमन गिलने (103) शतके ठोकली आहेत. सध्या कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत (50) नाबाद फलंदाजी करत आहेत.

दरम्यान, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत अफगाणिस्तानला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाकडून यशस्वी जयसवाल आणि केएल राहुल यांनी सलामीला येत दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टीम इंडियाला 41 या धावसंख्येवर यशस्वी जयसवालच्या (24) रुपात पहिला हादरा बसला. मोहम्मद सलीने त्याला बाद केलं. यशस्वी जयसावलच्या विकेटचा अफगाणिस्तानला फार वेळ आनंद घेता आला नाही. यशस्वीच्या जागी आलेल्या साई सुदर्शनने चांगली फलंदाजी करत 104 चेंडूंमध्ये 81 धावांची खेळी केली. साईच्या जोडीने केएल राहुलनेही आपले हात धुवून घेतले आणि शतक ठोकलं. त्याने 100 धावा करत धावसंख्येत भर घातली. केएल राहुलच्या पावलावर पाऊल ठेवत कर्णधार शुभमन गिलनेही शतक ठोकलं आहे. त्याने दिवसा अखेर 143 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 1 षटकार मारत 103 धावा केल्या आहेत. तर ऋषभ पंतने 70 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानकडून मोहम्मद सलीने 2 आणि रहमानने 1 विकेट घेतली